नेवासा
ऊस गुऱ्हाळाना इथेनॉल निर्मितीची संधी देण्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिल्याने राज्यातील गुऱ्हाळ चालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गुऱ्हाळ उत्पादकांना इथेनॉल निर्मितीची परवानगी देऊन त्यांनाही देशाच्या इंधन क्षेत्रात योगदान देण्याची संधी द्यावी अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील जलकमल ऑरगॅनिक्स या गुळ निर्मितीत काम करणाऱ्या उद्योगाचे संचालक प्रतापसिंह परदेशी व अमर लांडे यांनी मंत्री श्री. गोयल यांचे कडे केली होती. त्यावर आपण यासाठी सर्वोतपरी साह्य करु असे आश्वासन मंत्री गोयल यांनी दिले.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये मोठ्या संख्येने साखर कारखाने आहेत. राज्यात फार मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळ चालक गुळाची निर्मिती करत आहेत. दिवसेंदिवस ग्राहकाकडून बदलत्या जीवनशैलीसाठी गुळाची मागणी वाढल्याने हा व्यवसाय देखील वृध्दींगत होत आहे. आतापर्यंत शासनाने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी दिलेली आहे.त्याप्रमाणे राज्यातील गुऱ्हाळ चालकांना ही इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.
गुऱ्हाळ चालकांना इथेनॉल निर्मिती साठी संधी मिळावी यासाठी या उद्योगाचा स्टार्टअपमध्ये समावेश करु असे केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांनी सांगितले.तसेच जलकमल ऑरगॅनिक्सने इथेनॉल निर्मितीबाबत तांत्रिक तपासणीसह प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यानंतर तात्काळ त्यास इथेनॉल निर्मितीची परवानगी देण्याचे आश्वासन दिले. तसेच इतर गुऱ्हाळ उत्पादकांनी हा प्रयोग आर्थिकदृष्ट्या कसा उपयोगी ठरेल, याचा अभ्यास करावा. प्रकल्प यशस्वी झाल्यास त्याचा स्टार्टअप मध्ये समावेश करता येईल, असे त्यांनी सांगितले.
*अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सुटून शेतकऱ्यांना जास्तीचा पैसा मिळेल…*
पारंपरिक गुळ निर्मिती करतांना ऊस गाळप,गुळ निर्मिती व विक्री वर मर्यादा येतात. गुऱ्हाळाना इथेनॉल निर्मितीची परवानगी दिल्यास ऊस गाळप क्षमतेत वाढ करता येईल,त्यामुळे अतिरिक्त ऊस गाळपचा प्रश्न सुटेल,शेतकऱ्यांना इंधनाच्या परकीय चलनातून दोन लाख ते तीन लाख कोटी रुपये अतिरिक्त उत्पादन मिळाले तर शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल,गुऱ्हाळ चालकांनाही फायदा होईल.ऊर्जा क्षेत्रामध्ये शेतकरी व शेतीचे योगदान वाढेल.गुऱ्हाळाना इथेनॉल निर्मितीची परवानगी देण्याचे केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे.
*मोहनराव तुवर*
संचालक,श्री.वरद गुळ-काकवी प्रकल्प,पाचेगाव