नेवासा/प्रतिनिधी
तालुक्यातील विविध गावातील मंजूर करण्यात आलेले घरकुलाचे हप्ते लाभार्थ्यांना त्वरित देण्यासाठी नेवासा काँग्रेसकडून आज पंचायत समितीच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये सर्वसामान्य, गोरगरिब, मागासवर्गीय जनतेसाठी राज्यशासन व केंद्र सरकारकडून रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, इंदिरा गांधी आवास योजना , राज्य सरकारची महाआवास योजना अशा अनेक योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना राबविण्यात येत आहे . तालुक्यांत या माध्यमातून अनेक घरकुले मंजूर झाली आहे परंतु ग्रामपंचायत व अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्याऐवजी कोर्टाच्या चकरा माराव्या लागत आहे . मंजुर करण्यात आलेल्या घरकुलांचा एक एक हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्ता वर्ग करण्यात आला आहे, घरकुलाचे पाया पर्यंतचे काम पूर्ण झाले असताना दुसरा हप्ता देण्यास ग्रामपंचायत अनेक कारणे देवून टाळाटाळ करत आहे. यासाठी लाभार्थ्यांना जबाबदार धरून पहिला हप्ता परत ग्रामपंचायतीस मागे द्यावा अशी मागणी करत ग्रामपंचायत करत आहे, त्यासाठी ग्रामपंचायतकडून लाभार्थ्यावर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. हक्काचे घरकूल मिळणे दूरच परंतु उलटपक्षी लाभार्थ्याला कोर्टाच्या चकरा माराव्या लागत आहे. नेवासा काँग्रेसने याची दखल घेऊन मागील महिन्यात गटविकास अधिकारी यांना भेटुन अपूर्ण राहिलेल्या घरकुलाचे पुढील हप्ते घरकूल लाभार्थीस त्वरित तातडीने वर्ग करावे अशी मागणी केली होती. परंतु प्रशासनाने याची दखल न घेतल्याने आज नेवासा काँग्रेस कमिटीने लाभार्थ्यासह नेवासा पंचायत समितीसमोर चार तास धरणे आंदोलन केले. यावेळी नेवासा पंचायत समिती गटविकास अधिकारी दिघे साहेब यांच्याशी चर्चा करून येत्या आठवडाभरात घरकुलचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे स्पष्ट केल्यानंतर आंदोलनं थांबविण्यात आले. यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी तालुक्यातील एकाही व्यक्तीचे घरकूल अपूर्ण राहणार नाही यासाठी वेळ पडली तर अजुन आक्रमक भूमिका घेतली जाईल असे स्पष्ट केले. यावेळी नेवासा काँग्रेसचे संदीप मोटे, उपाध्यक्ष सतिष तऱ्हाळ, शहराध्यक्ष रंजन जाधव, अंजुम पटेल, मुसा बागवान, संजय होडगर, गोरक्षनाथ काळे, राजू चव्हाण, महीला काँग्रेसच्या शोभा पातारे, ज्योती भोसले, अर्चना बर्डे, अंजाबई चक्रनारायन, युवक काँग्रेसचे आकाश धनवटे, अनिल सकट, जिल्हा काँग्रेसचे सुदामराव कदम, कार्लस साठे, श्याम मोरे, आदीसह घरकूल लाभार्थी उपस्थित होते. यावेळी नेवासा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना यासंदर्भात सविस्तर मागणीचे निवेदन देण्यात आले.