Wednesday, August 17, 2022

नवनिर्मितीचे शिल्पकार : लोकनेते मारुतरावजी घुले पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

कुठली व्यक्ती विशिष्ट ध्येय, उद्दिष्ट, हेतू व दृष्टिकोन घेऊन जन्माला येत नाही. हे सर्व कर्तृत्वाने घडते. आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता, उच्च ध्येयवाद, उत्तुंग आदर्श, प्रचंड कार्यक्षमता स्वतःमध्ये निर्माण करून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जी माणसे समाजसेवेचे व्रत घेऊन आपले संपूर्ण जीवन लोककार्याला समर्पित करतात अशाच व्यक्तीची इतिहास नोंद घेतो. अहमदनगर जिल्ह्यात विसाव्या शतकात राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग या क्षेत्रात जे ग्रामीण नेतृत्व उदयाला आले त्यामध्ये एकेकाळचे अहमदनगर जिल्ह्याचे नेते, शेवगाव-नेवासा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते स्व. मारूतरावजी घुले पाटील हे अग्रभागी होते. त्यांनी या भागात हरितक्रांती घडवून आणली. समाजाला नवी दिशा दिली. अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान दिले म्हणून अहमदनगर जिल्ह्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा स्वातंत्र्योत्तर इतिहास अभ्यासायचा झाला तर लोकनेते स्व .मारुतरावजी घुले पाटील यांचे योगदान समजून घेणे अपरिहार्य ठरते.

त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३० रोजी झाला. उपजतच त्यांना समाजकार्याची आवड होती श्रीरामपूर येथे शिक्षण घेत असताना शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली. वसतिगृहात राहणाऱ्या मुलांसाठी ते मित्रांच्या सहाय्याने धान्याची व पैशाची मदत गोळा करत .तो काळ पारतंत्र्याचा होता. स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत स्वातंत्र्यलढा समजावून घेतला. प्रभात फेरी सारख्या उपक्रमात भाग घेतला. त्यांनी दहिगावच्या पाटीलकीची सूत्रे हाती घेतली तेव्हा. या काळात हैदराबाद सरकारच्या सीमेवरून रझाकांरांचा त्रास शेतकऱ्यांना होत होता तो त्रास कमी करण्यासाठी त्यांनी गावातील युवकांना एकत्र करून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करुण रझाकारांचा मुकाबला केला . तो काळ सावकारशाहीचा होता. गोरगरीब जनता सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडलेली होती. अनेकांच्या जमीनी सावकर कवडीमोलाने गिळंकृत करत होते. अशा परिस्थितीत त्यांनी जिल्हा सहकारी बँकेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील सहकाऱ्यांच्या साह्याने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची स्थापना केली. बँकेमार्फत कर्ज पुरवठा सुलभ व्हावा म्हणून गावोगाव सहकारी सोसायट्या स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य किंमत मिळावी व शेतकऱ्यांना योग्य किमतीत खते व अवजारे उपलब्ध व्हावीत म्हणून शेवगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघ या संस्था दीर्घकाळ चालविल्या. कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून शेवगाव येथे जिनिंग प्रेसिंग मिल ची स्थापना केली.
लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्यावर म.फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, म.गांधी, पंडित नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव होता. खेड्यापाड्यात कर्मवीर भाऊराव पाटलांचे चाललेले शैक्षणिक कार्य पाहून ते प्रभावित झाले होते. आपल्याही परिसरातील शेतकरी, कष्टकरी, दलित, समाजाची मुले- मुली शिकले पाहिजे या हेतूने त्यांनी १९५९साली दहिगाव-ने येथे जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून नवजीवन विद्यालय सुरू केले. वसतिगृह सुरू करून परिसरातील गोरगरीब मुलांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली व परिसरात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. १९६० साली भारताचे भाग्यविधाते पहिले पंतप्रधान पंडित नेहरू नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना काँग्रेसचे एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून नेहरूंसमोर त्यांनी जिल्ह्यातील प्रश्न मांडले.१९६१ साली झालेल्या अखिल भारतीय कृषक समाज या राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी संघटनेचे ते सदस्य झाले व नवी दिल्ली येथे शेतकरी परिषदेत हजर राहून राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. १ मे १९६oसाली संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राची सूत्रे हातात घेतली आणि महाराष्ट्र प्रगतिपथावर नेण्यासाठी महाराष्ट्रात अनेक अनुयायी त्यांनी तयार केले त्यात लोकनेते मारुतराव घुले पाटील हे अहमदनगर जिल्हयातून अग्रभागी होते.१० वर्षे त्यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. जिल्ह्यात काँग्रेस मजबूत केली. त्यांचे संघटन पाहून यशवंतराव चव्हाण यांनी १९६२ साली त्यांना शेवगाव- नेवासा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. ते प्रचंड मतांनी निवडून आले. तर १९६७ सालीही ते विधान सभेत निवडून गेले. विधानसभेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. शिक्षण हे सक्तीचे केले पाहिजे असा आग्रह धरला. १९६५ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे भव्य शिबिराचे नियोजन व संयोजन त्यांनी कुशलतने केले.
सदैव शेतकऱ्यांची काळजी करणारे लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्यावर जायकवाडी धरण निर्मितीमुळे मोठा आघात झाला. शेवगाव- नेवासा भागातील हजारो एकर काळीकसदार जमीन पाण्याखाली गेली. त्या कठीण परिस्थितीत त्यांनी विस्थापितांना सावरले. त्यांना भक्कम आधार दिला. धरणग्रस्तांचे पुनर्वसन व कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी मिळाली पाहिजे, धरणग्रस्तांसाठी जायकवाडी धरणाचे ३टीएमसी पाणी राखीव असा कायदा विधानसभेत पास करून घेतला. गोदाकाठच्या शेतकऱ्यांना जायकवाडी बॅकवॉटरचा लाभ मिळावा म्हणून वैयक्तिक पाईपलाईन, लिफ्ट योजना, वीजजोडणी यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. सहकारी बँकेमार्फत आर्थिक पुरवठा केला. त्यामुळेच आज गोदाकाठ समृद्ध झालेला दिसतो. जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शेवगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली. तर शेवगाव- नेवासा भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून नेवासा येथे ज्ञानेश्वर महाविद्यालयाची भेंडा येथे जिजामाता महाविद्यालय , कृषी तंत्र विद्यालय , वसतिगृह , आयटीआय , खेडयापाडयात माध्यमिक विद्यालये स्थापन करुन शिक्षणाचा प्रसार केला .
मुळाधरणाचे पाणी शेवगाव- नेवासा भागातील शेवटच्या घटकापर्यंत मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. या पाण्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढले उसासारखे नगदी पीक शेतकरी घेऊ लागला परंतु खासगी साखर कारखाने मनमानी करू लागले. शेतकऱ्यांना ऊस बांधावर तोडून टाकण्याची वेळ आली तेव्हा लोकनेते मारुतरावजी घुले पाटील व्यथित झाले. शेवगाव- नेवासा परिसरात शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभा राहिला पाहिजे असा त्यांनी निश्चय केला व यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, अण्णासाहेब शिंदे, यांच्या सहकार्याने खूप कष्टसहन करत १९७३ साली केंद्रशासनाकडून परवानगी मिळवली. व भेंडा येथे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. १२५० में. टन गाळप क्षमतेचा साखर कारखाना १९७५ पासून सुरू झाला आणि परिसराचा चेहरामोहरा बदलला. या भागात वीज मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतले. दूरध्वनी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिरासमोर पहिल्या वीज पोलाची पूजा करण्यात आली तर नगरयेथून लाकडी पोल टाकून दूरध्वनी सुरू करण्यात आले. १९७२ साली त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली. विधानपरिषदेतही त्यांनी शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न मांडले. . १९९९ मध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे शरद पवारच देशाला खंबीर नेतृत्व देऊ शकतात हे ओळखून त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव मिळावा म्हणून त्यांनी अल्कोहोल निर्मिती प्रकल्प उभारला परंतु अल्कोहोल पासून दारू निर्मिती कटाक्षाने टाळली.
१२५०० प्रतिदिनी गाळप क्षमता असणाऱ्या कारखान्याचे त्यांनी २००१ पर्यंत ५००० मे.टन प्रतिदिनी विस्तारीकरण केले सभासद बिगर सभासद असा भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना समान भाव दिला. कामगारांना स्वतःची घरे बांधण्यासाठी कारखान्याच्या मालकीची जागा देऊन आर्थिक मदत केली. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कारखाना म्हणून नावलौकिक मिळवून दिला. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली १९९५ मध्ये त्यांना इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार, १९९६ साली भारतीय उद्योगरत्न पुरस्कार, १९९७ मध्ये सहकार भूषण पुरस्कार हे पुरस्कार प्राप्त झाले तर ज्ञानेश्वर साखर कारखान्यास उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दल अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. सन २००० मध्ये आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाले. त्यांच्या पुरोगामी विचारसरणीचा प्रत्यय वेळावेळी आला माहिला व मागासवर्गीयांना राजकीय आरक्षण नसतानाही त्यांनी त्याकाळी आपल्या दहिगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद मागास वर्गीय महिलेला तर शेवगाव पंचायत समितीचे सभापती पद मागासवर्गीय उमेदवारास बहाल केले. १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत स्वतःच्या मुलाची उमेदवारी रद्द करून अल्पसंख्याक समाजातील मा . पांडूरंग अभंग यांना उमेदवारी देऊन विधानसभेवर निवडून दिले .शिक्षण संस्था व साखर कारखान्यात अनेक शेतकरी ,दलित यांना नोकऱ्या दिल्या. गोरगरिबांचे संसार उभा केले. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत व संयमी होता. समोरच्या माणसाची समस्या ते जाणून घेत व सोडवत. दुष्काळात गावकऱ्यांना आठरापगड जातीतील लोकांना आपल्या घरचं धान्य मोफत वाटप करत . गोरगरीबा घरच्या लग्नकार्यात , आजारपणात सढळ हाताने मदत करत. परिसरातील जनतेला ते घरातीलच कर्ता पुरुष वाटत असे येवढा विश्वास त्यांनी निर्माण केला होता . म्हणून परिसरातील जनतेने मालक, भाऊसाहेब या पदव्या त्यांना प्रेमाने बहाल केल्या.
शेवगाव- नेवासा भागाला शेती, शिक्षण, वीज, पाणी, उद्योग, या बाबतीत त्यांनी स्वयंपूर्ण केले रचनात्मक ग्रामीण विकासाचा पाया त्यांनी घातला म्हणून या परिसराचे ते विकासाचे शिल्पकार ठरले आहेत. समाजकार्यात कार्यरत असतानाच त्यांचे ८ जुलै २००२ रोजी निधन झाले. परंतु त्यांनी दिलेला विचार केलेली कामे चिरंतन असून अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी शेवगाव-नेवासा भागाचे दोन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले असून त्यांच्या कार्यावर आपल्या कर्तृत्वाने कळस चढवला आहे. तर शेवगाव-पाथर्डी मतदार संघात त्यांचे दुसरे चिरंजीव माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांनी प्रतिनिधत्व करुन मतदारसंघात सर्वाधिक विकासनिधी आणून नेत्रदीपक कार्याचा ठसा अल्पावधित जनतेत उमठवला . नातू डॉ.क्षितिज घुले पाटील हे शेवगाव पंचायत समितीचे सभापती व स्नुषा राजश्रीताई घुले पाटील अ . नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना तालुक्यात व जिल्ह्यात नेत्रदिपक विकास कामे केली आहेत एक कर्तृत्वसंपन्न, कामाचा मोठा आवाका असणारे सुसंस्कृत, चरित्रसंपन्न, जिद्दी व लढवू घुले पाटील कुटुंबिय आज लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे नवनिर्मितीचे अधुरे स्वप्न साकार करत आहेत हेच येथील जनतेचे भाग्य आहे. लोकनेते मारूतरावजी घुले पाटील यांचे आज पुण्यस्मरण या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
शब्दांकन -प्रा . भाऊसाहेब सावंत
संकलन -बाळासाहेब आरगडे

ताज्या बातम्या

error: Content is protected !!