माय महाराष्ट्र न्यूज:आषाढी एकादशी निमित्त वारकरी आषाढी वारीस पंढरपूरला जात आहेत. या वारक-यांच्या तसेच भाविकांच्या
वाहनांना राज्य शासनाने 15 जूलैपर्यंत पथक करातून सूट म्हणजे टाेल माफी जाहीर केली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच जाहीर केला. त्यानंतर त्याची सातारा
जिल्ह्यात सात जूलैपासून अंमलबजावणी सुरु झाली. दरम्यान टाेल माफी मिळावी यासाठी वारक-यांनी अथवा भाविकांनी सातारा पाेलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पाेलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे.
बन्सल यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी सातारा जिल्ह्यातून आनेवाडी टाेलनाका व तासवडे टाेलनाका येथे भाविकांच्या पालख्या, हलक्या व जलद
वाहनांना असुविधा हाेऊ नये यासाठी पथकर सवलतीचे (टाेल माफीचे) स्टिकर्स देण्यात येणार आहेत.आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाणा-या भाविकांनी त्यांचे वाहनांना सवलतीचे
स्टिकर्स पाेलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा विशेष शाखा (सातारा), भुईंज पाेलीस ठाणे, तळबीड पाेलीस ठाणे येथून उपलब्ध करुन घ्यावेत. तसेच आनेवाडी टाेल नाका व तासवडे टाेल नाका येथे
असुविधा निर्माण झाल्यास भुईंज पाेलीस ठाणे, तळबीड पाेलीस ठाणे तसेच टाेलनाका येथे उपस्थित असणारे पाेलीस अधिकारी किंवा अंमलदार यांच्याशी
संपर्क साधावा असे आवाहन पाेलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे.