अहमदनगर/ प्रतिनिधी
विधवा महिलांचा सन्मान करण्यासाठी महिला सन्मान कायदा करण्यात यावा तसेच कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना विधवा किंवा एकल झालेल्या महिलांना
स्वयंसिध्दा असे संबोधित करावे अशी मागणी कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार प्राप्त समाजसेविका सौ.बेबिताई गायकवाड यांनी राज्याचे महिला व बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे कडे केली आहे.
सौ.गायकवाड यांनी राज्याचे महिला व बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेऊन या मागणीचे पत्र दिले.त्या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की,आज २१ व्या शतकात वावरत असतांना विज्ञानवादी व प्रगतशील समाज म्हणुन आपण वाटचाल करत आहोत. मात्र आजही समाजात विधवा प्रथे सारख्या अनिष्ट प्रथा प्रचलीत असल्याचे आढळून येतात. पतिच्या निधना नंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसुत्र तोडणे, हातातील बांगडया फोडणे, पायातील जोडवी काढली जाते. यांसारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जात आहे. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यात सहभागी होऊ दिले जात नाही, तरीही अनिष्ट, रूढी, प्रथा बंद करण्याबाबत कायदा व्हावा.
तसेच गेल्या २ वर्षांपूर्वी कोरोना सारख्या महामारीने अगदी २५ ते ३५ वयोगटातील तरूण महीला विधवा झाल्या तरीही त्यांनी हार न मानता कुटुंबासाठी त्या पुन्हा उभ्या राहिल्या. अशा महिलांना विधवा किंवा एकल महिला न म्हणता ‘स्वयंसिध्दा’ असे संबोधण्यात यावे अशी ही मागणी केली आहे.