माय महाराष्ट्र न्यूज: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे श्रीरामपूर
तालुका प्रसिद्धीप्रमुख संदीप आसने यांनी केली आहे.गेल्या अडीच वर्षांपासून कै.अण्णासाहेब पाटील महामंडळाला अध्यक्ष मिळालेला नाही,अध्यक्ष नसल्यामुळे लाभार्थ्यांना येणाऱ्या
अडचणी कुणाकडे मांडाव्यात असा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महामंडळाचे काम संथ गतीने चालले आहे.मराठा समाजातील युवकांना व्यवसायासाठी कर्ज देण्यास
बैंका टाळाटाळ करत आहेत,नरेंद्र पाटील यांनी यापूर्वी अध्यक्ष पदावर असतांना महाराष्ट्रातील २६ जिल्हे २८० तालुक्यात स्वतः दौरे करून कै. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे.
महामंडळ व बँक यांच्यामधील दुवा बनून लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या समस्या तात्काळ दूर करण्याचे काम मा. नरेंद्र पाटील यांनी केले आहे, केवळ राज्याचाच नव्हेतर संपूर्ण
देशांमध्ये एक आदर्श महामंडळाचा कारभार आणि पारदर्शी लोकाभिमुख अध्यक्ष कसा असावा याचे उदाहरण महामंडळाच्या कामामधून दाखवून दिले आहे.मराठा समाजातील
तरुणांच्या मनातील कै.अण्णासाहेब पाटील महामंडळाचा अध्यक्ष हे आजही नरेंद्र अण्णासाहेब पाटील आहेत. मराठा समाजासाठी कर्तव्यदक्ष, बेधडक, समाजाप्रती प्रामाणिक काम करण्याची इच्छा
असणारे व्यक्तिमत्व नरेंद्र पाटील आहेत, मराठा समाजातील युवकांना उद्योजक बनविण्यासाठी नरेंद्र पाटील यांची पुन्हा कै. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी अशी मागणी
संदिप आसने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यकडे इमेलद्वारे केली आहे.