दिल्ली
देशात 100 टक्के इथेनॉल इंधनावर धावणारी वाहने येत्या ऑगस्ट महिन्यात लॉंच करण्यात येतील अशी घोषणा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत केली आहे.
सध्या भारतीय बाजारात इथेनॉलची किंमत 66 रुपये प्रति लीटरच्या आसपास आहे,त्यामुळे आता लवकरच 66 रुपये लिटर इंधनात गाड्या धावणार आहेत.
नेहमीच नवनवीन संकल्पनांद्वारे सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडणाऱ्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक जोरदार घोषणा केली आहे. देशात 100 टक्के इथेनॉल इंधनावर धावणारी वाहने येत्या ऑगस्ट महिन्यात लॉंच करण्यात येतील अशी घोषणा गडकरी यांनी एका मुलाखतीत केली आहे. हा निर्णय देशासाठी क्रांतीकारक ठरणार आहे. यामुळे आयात शुल्क, इंधनावरील खर्च आणि प्रदुषण कमी होणार आहे. तसेच संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानातून इथेनॉल इंधनावरील वाहनांची निर्मिती केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्या भारतीय बाजारात इथेनॉलची किंमत 66 रुपये प्रति लीटरच्या आसपास आहे. आणि पेट्रोलची किंमत 108 रुपयांच्या आसपास आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भारतीय रस्त्यावर स्वस्तातील इथेनॉलवरील दुचाकी आणि चारचाकी वाहने धावताना दिसणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढे म्हटले की, ऑगस्ट महिन्यात 100 टक्के इथेनॉल इंधनावरील वाहने लॉंच करण्यात येतील, बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी 100 टक्के इथेनॉल इंधनावर धावणारी मोटारसायकली तयार केल्या आहेत. टोयोटा कंपनीच्या 60 टक्के पेट्रोल आणि 40 टक्के वीजेवर चालणाऱ्या कॅमरी कारच्या धर्तीवरील वाहने देशात लॉंच केली जातील. जी 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के वीजेवर चालतील.
पेट्रोल-डीझल गाड्यांमुळे होणारे हवेचे प्रदुषण रोखण्यासाठी पारंपारिक इंधनाचे वाढते दर पाहून जगभरातील सरकारे इथेनॉल ब्लेंडेड फ्युअलवर काम करीत आहेत. भारतात देखील इथेनॉलला पेट्रोलला पर्याय म्हणून पाहीले जात आहे. इथेनॉलमुळे गाड्यांचे मायलेज वाढणार आहे. देशात 5 टक्क्यांच्या इथेनॉलपासून प्रयोगाला सुरुवात झाली होती. ती आता 20 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.
केंद्र सरकारने एप्रिल महिन्यापासून नॅशनल बायो फ्युअल पॉलिसी लागू करीत E – 20 ( 20 टक्के इथेनॉल+ 80 टक्के पेट्रोल ) पासून ते E -80 ( 80 टक्के इथेनॉल + 20 टक्के पेट्रोल ) पर्यंत पोहचण्यात लक्ष्य गाठण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. देशात एप्रिलपासून केवळ फ्लेक्स फ्युएल कंप्लाईंट गाड्यांची विक्री सुरु केली आहे. जुन्या गाड्यांना इथेनॉल इंधन कम्पाएंट व्हीईकलमध्ये परिवर्तीत करण्याची योजना आहे. परंतू याकरीता अजूनही इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही.