माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाल्यानंतर आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याचे दिसून येते.
गेल्या २ वर्षांपासून रखडलेल्या नगरपालिका, महापालिका आणि पंचायत समितींच्या निवडणुका आता माहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होतील, असे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहे. निवडणूक
आयोगाचे एक परिपत्रक समोर आले असून त्यामध्ये आगामी निवडणुकांसाठी मतदार यादीसंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. ५ जुलै २०२३ रोजीचा हा आदेश आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे उप-सचिव सुर्यकृष्णमूर्ती यांच्या
आदेशाचे हे पत्र असून १ जुलै २०२३ रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार करणाऱ्या याद्यांसाठी वापरण्यात येतील, असे या आदेश पत्रात म्हटले आहे.
त्यामध्ये, जिल्हा परिषद,पंचायत समित्या, नगरपंचायत, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका माहे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येतील, असे संकेतही आयोगाने दिले आहेत. त्यामुळे, आता राज्यात लवकरच
निवडणुकांचा बिगुल वाजणार असून मतदारराजाला मतदानाची संधी मिळणार आहे. दरम्यान, राज्यात २६ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २०७ नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत.
याव्यतिरिक्त ९२ नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळेच, मागील जवळपास २ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यातच, राजकीय मैदानात
अनेक चौकार-षटकार, गुगली आणि विकेट्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे, सर्वसामान्य मतदारही निवडणुकांसाठी उत्सुक आहे.