माय महाराष्ट्र न्यूज:आगामी काळ देशासाठी विविध दृष्टिकोनांतून महत्त्वाचा असून लोकसभा निवडणुका जवळ येतील तसा भाजपचा आक्रमकपणा वाढत जाणार आहे. त्यामुळे
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी आपापसातील मतभेद दूर करावेत. गट-तट विसरून काँग्रेस पक्ष मजबूत केला पाहिजे. महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षांमध्ये होत असलेल्या घडामोडींचा परिणाम काँग्रेसवर
होऊ नये याची दक्षता घ्यावी. परस्परांबद्दलची मते किमान माध्यमांसमोर व्यक्त करू नयेत’, असे काँग्रेस हायकमांडने राज्यातील पक्षनेत्यांना बजावल्याची माहिती मिळाली आहे.२०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये
राज्यातून किमान १५ ते २० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे, अशीही सूचना पक्षनेतृत्वाने या नेत्यांना केली. राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीतील बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,
बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, खासदार रजनी पाटील, वर्षा गायकवाड, अमित देशमुख, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, सुनील केदार आदी सुमारे २५ नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या १७ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात
विरोधी पक्षनेत्यांची निवड करण्याचे बैठकीत ठरले. सर्व दृष्टिकोनातून विचार केला तर विधानसभेतील काँग्रेसचे सध्याचे गटनेते बाळासाहेब थोरात किंवा वर्षा गायकवाड यांच्यासारख्या एखाद्या तरुण नेत्याकडे
विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी हायकमांड देईल, अशी शक्यता एका ज्येष्ठ नेत्याने वर्तविली.