माय महाराष्ट्र न्यूज:यावर्षी राज्यामध्ये मान्सूनचे उशिरा आगमन झाले. अद्याप राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्यो म्हणावा तसा पाऊस पडला नाही.
चांगला पाऊस पडत नसल्यामुळे बळीराजा संकटात आला आहे. जोरदार पाऊस पडत नसल्यामुळे तलावांमधील पाणीसाठी कमी झाला आहे त्यामुळे अनेक शहरांवर पाणीकपातीचे सावट आहे.
शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य जनता जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. अशामध्ये आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आज कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि तळ कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा,
विदर्भात जोरदार वारे, ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील जारी केला आहे.
आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदूरबार, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असे हवामान खात्याने सांगितले आहे.तर, आज जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया,
नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये आज ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार किंवा हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना
पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.