Saturday, September 23, 2023

नवीन शेततळ्यांकरिता ४६ कोटिंचा निधी

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

पुणे

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून नव्या शेततळ्यांची खोदाई करण्यासाठी ४६ कोटी रुपये विविध जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यात नव्याने १०२३ शेततळ्यांची खोदाई करणाऱ्या शेतकऱ्यांना साडेसहा कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

मृद् संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाचे संचालक रवींद्र भोसले व सहसंचालक पांडुरंग शेळके यांच्याकडून शेततळे योजनेला वेग देण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात आहे. श्री. शेळके म्हणाले, “पावसामुळे नव्या शेततळ्यांची खोदाई शेतकऱ्यांनी तूर्त थांबवली आहे. मात्र दिवाळीनंतर या योजनेला पुन्हा गती मिळेल. कृषी आयुक्तालयाने या योजनेतील ऑनलाइन त्रुटींचा अभ्यास करीत त्या दूर केल्या आहेत. त्यामुळे योजनेत सुटसुटीतपणा आला आहे.”

शेततळे खोदाईत पुणे विभाग आघाडीवर आहेत. “कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांच्याकडून आयुक्तालयापासून ते थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत या योजनेचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे अडीच हजारांहून अधिक शेततळ्यांना पूर्वसंमती देण्यात आली.शेतकऱ्यांनी १७०० शेततळ्यांची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केली आहेत. यातील ५०० तळ्यांचे अनुदान अदा करण्यास मंजुरी मिळाली आहे. पुण्याप्रमाणेच इतर विभागांनी या योजनेसाठी अधिक वेळ देण्याची गरज आहे,” असे श्री. शेळके यांनी स्पष्ट केले.

शेततळ्यांसाठी जिल्हानिहाय देण्यात आलेले अनुदान वापरले न गेल्यास निधी परत जात नाही. त्याऐवजी शिल्लक निधी गरज असलेल्या जिल्ह्यांना पाठविला जात आहे. राज्यात शेततळ्यासाठी ५५ हजार शेतकऱ्यांना सोडत लागलेली आहे. त्यापैकी १५ हजार शेतकऱ्यांनी तळे खोदाईची तयारी दर्शविली. मात्र, यातील ८ हजार शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. त्यापैकी साडेसात हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी खोदाई पूर्ण करीत बिले अपलोड केली आहेत.

*शेततळे अनुदानासाठी जिल्हानिहाय उपलब्ध निधी(आकडे लाख रुपयांमध्ये)*

ठाणे २१.९५, पालघर १८.४०, रायगड १८.४६, रत्नागिरी ८.३०, सिंधुदुर्ग १३.७९, नाशिक ४७०, धुळे ३६.७०, जळगाव १०६, नंदुरबार १००, अहमदनगर ८८२, सोलापूर ७२६, पुणे ४६०, सातारा ८.३१, सांगली २३२, कोल्हापूर ५१.६०, छत्रपती संभाजीनगर ७४.१६, जालना ५१.६३, बीड ११३, लातूर १५४, धाराशिव ९२.५५, नांदेड ५.४४, परभणी ७७.१०, हिंगोली १६५, बुलडाणा ५१.९६, अकोला ३८, वाशीम ६५.१०, अमरावती ३७.८३, यवतमाळ५७.१७, वर्धा ३२.६७, नागपूर ४०.८५, भंडारा १७, गोंदिया ४४.७३, चंद्रपूर ३०.१४, गडचिरोली १६७.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!