माय महाराष्ट्र न्यूज:पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांत पाण्याची आवक सुरू आहे.
पुढील पावसाळ्यापर्यंत धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी पुरेल अशी परिस्थिती आहे. समाधानकारक पावसाअभावी पेरणी फक्त 35 टक्के झाली आहे. गेल्या वर्षीचा उत्पादित झालेला चारा जुलैअखेरपर्यंत पुरणार आहे.
पावसाने दडी मारल्यास चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता ग्रहीत धरून जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी घातली आहे. याबाबत सोमवारी आदेश जारी होणार आहेत.सद्यःस्थितीत जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
आगामी कालावधीत पिण्याचे पाणी आणि चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी
सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, मुळा कार्यकारी अभियंता सायली पाटील, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, नगरपालिका विभागाचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर यांच्यासह सर्वच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सध्या 14 टक्के बाजरी, 43 टक्के मक्याची पेरणी झालेली आहे. त्यामुळे आगामी दीड महिन्यांत हा चारा उपलब्ध होणार आहे. याशिवाय पावसामुळे शेताच्या बांधावर गवतदेखील उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत चाराटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी
जिल्ह्यातील हिरवा, कोरडा, मूरघास टीएमआर आदी चारा जिल्ह्याबाहेर वाहतुकीस बंदी घालण्याचा निर्णय बैठकीत झाला असून, सोमवारी याबाबत आदेश जारी होणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.