माय महाराष्ट्र न्यूज: भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष सध्या महाराष्ट्रात हळूहळू पण जोमाने पाय पसरत आहे.
नगर जिल्ह्यातही बीआरएस’ने जम बसवण्यास सुरुवात केली असून काही मोठी नावे पक्षात प्रवेश करत आहेत.श्रीरामपूरमध्ये रविवारी झालेल्या बीआरएस पक्षाचा मेळावा पक्षाचे तेलंगणामधील
मराठी भाषिक खासदार बी.बी.पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी तालुक्यातील अनेक नेते कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. या मेळाव्याचे आयोजन जिल्हा समनव्यक अशोक बागुल यांनी केले होते.
यावेळी पक्षाचे बी.जे.देशमुख, सुवर्णा काठे,माणिकराव देशमुख आदी राज्यातील नेते उपस्थित होते.विशेष म्हणजे श्रीरामपूर इथे मेळाव्याच्या निमित्ताने आलेले बीआरएसचे खासदार बी.बी.पाटील यांच्या जेष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांच्या
निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.श्रीरामपूरचे माजी आमदार आणि सहकारातील जेष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांनी गेल्या महिन्यातच तेलंगणात मुख्यमंत्री के.चंद्रशेखर
राव यांची भेट घेतली होती. तसेच तिथल्या सरकारच्या कामांची पाहणी करून कौतुक केले होते. मुरकुटे यांनी अद्याप अधिकृत बीआरएस पक्ष प्रवेश केलेला नाही.या पार्श्वभूमीवर मेळाव्यास उपस्थित नसलेले भानुदास मुरकुटे यांनी आपल्या निवासस्थानी
खासदार बी.बी.पाटील यांना जेवणासाठी निमंत्रित केले होते. यानिमित्ताने मुरकुटे यांच्या निवासस्थानी झालेल्या सदिच्छा भेटीवेळी शिर्डीचे शिवसेना शिंदे गटाचे खा.सदाशिव लोखंडे उपस्थित होते.त्यांनीही खा.पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मात्र या भेटीबद्दल अजून खा.लोखंडे यांच्या कडून कोणतेही वक्तव्य पुढे आलेले नाही. संसदेत बी.बी.पाटील खासदार असल्याने खा.लोखंडे यांची ही सदिच्छा भेट वा योगायोगाने झालेली भेट असू शकते.