माय महाराष्ट्र न्यूज:भाजपच्या विद्यमान जिल्हाध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून नव्या 70 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे.
भाजप केंद्रासह राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे या पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्षपदास चांगलेच वलय प्राप्त झाले आहे. आगामी लोकसभा, विधानसभासह आगामी होणाऱ्या स्थानिक निवडणुका लक्षात घेता जिल्हाध्यक्षपद अधिकच वजनदार बनले आहे.
ही बाब लक्षात घेता जिल्हाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडावी, यासाठी इच्छुक चांगलेच कामाला लागले होते. अहमदनगर शहर अभय आगरकर, अहमदनगर उत्तर विठ्ठलराव लंघे, अहमदनगर दक्षिण दिलीप भालसिंग यांची निवड करण्यात आली आहे.
भाजप जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे.
मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत.