भेंडा/नेवासा
शालेय जीवनात शिक्षकांनी विदयार्थ्यांवर केलेल्या चांगल्या संस्काराच्या बळावरच विदयार्थी भावी आयुष्यात यशस्वी होतात.आपले व परिसराचे नाव उंचावत असतात.प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांमुळे राज्यात व देशात शिक्षण संस्थेचे व जिजामाता माध्यमिक-उच्च माध्यमिक विदयालयाचे नाव उंचावले आहे असे श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी केले.तर जिजामाता विद्यालयाचा विद्यार्थी असल्याचा मला अभिमान असल्याचे उदगार आयएएस गुलाबराव खरात यांनी काढले.
भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित राज्य सरकारच्या प्रशासकीय सेवेत समावेश झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन श्री.घुले बोलत होते.संस्थेचे विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग,अड. देसाई देशमुख,काशीनाथ नवले, अशोकराव मिसाळ,शिवाजीराव कोलते, गणेशराव गव्हाणे, डॉ. शिवाजी शिंदे, अजित मुरकुटे, सरपंच उषा मिसाळ,डॉ.लहानु मिसाळ, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे ,प्राचार्य महादेव मासाळकर ,पर्यवेक्षक बाळासाहेब मोटे ,प्राचार्य सोपान मते, डॉ.निलेश खरात,गोरक्षनाथ पाठक,सुधाकर नवथर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्य नागरी सेवा केडरमधून भारतीय प्रशासकीय (आयएएस) सेवेत समावेश झालेले धुळयाचे अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात,पोलिस उपनिरिक्षक तुषार नवले,प्रांजली आंबेडकर,पशुधन विकास अधिकारी अनिकेत आरोळे, मंत्रालय अधिकारी भूपेंद्र अंधारे या माजी विद्यार्थ्यांची प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल तसेच इ. ८ वीतील शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणारे रितेश घुले ,साईराज देशमुख ,सोहम पोतदार यांचा श्री.घुले यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
श्री.घुले पुढे म्हणाले की, प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या विदयार्थांचे यश कौतुकास्पद आहे. त्यांचा आदर्श घेत इतर विद्यार्थ्यांनी अभ्यास करून विविध क्षेत्रात आदर्शवत वाटचाल करावी व आपले भविष्य उज्वल करावे.
आयएएस गुलाबराव खरात म्हणाले,मी जिजामाता माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे .विद्यार्थ्यांनी देखील आपल्या शाळेचा व परिसराचा,मातीचा अभिमान ठेवत जीवनात अभ्यास ,कष्ट ,मेहनत करत यश संपादन करावे.
उपप्राचार्य प्रा.भारत वाबळे यांनी प्रास्ताविक केले.सविता नवले व राजेंद्र गवळी यांनी सुत्रसंचालन केले.