नेवासा
भिंगारमधून चोरीला गेलेला २२ लाखाचा जेसीबी देडगाव ता. नेवासा येथे मिळून आला असून सदरचा जेसीबी चोरणार्या पाचुंदा, माका येथील दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. अंबादास सोनाजी होंडे (वय ३० वर्षे) व अजित कैलास शेंडगे (वय २२ वर्षे), दोघे रा. पाचुंदा-माका अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दोघांनी सदरचा जेसीबी देविदास शिवाजी वाकडे व सागर शिवाजी वाकडे ,दोघे रा. लिबे नांदूर, ता. शेवगाव यांच्या सांगण्यावरून चोरी केल्याची कबूली दिली आहे. किसन हनुमंत कर्डीले (वय 52वर्षे) रा. बाणेश्वर मंदिरामागे, बुर्हाणनगर ता. नगर यांच्या मालकीचा २२ लाखाचा जेसीबी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असल्याची फिर्याद त्यांनी २६ जुलै रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिली होती.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहा. निरीक्षक दिनकर मुंडे यांना माहिती मिळाली की, चोरीस गेलेला जेसीबी हा देडगाव येथे आहे. सहा. निरीक्षक मुंडे यांनी त्यांच्या पथकाला खात्री करून कारवाईचे आदेश दिले. पथकाने देडगाव येथून जेसीबी ताब्यात घेतला. सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान व तांत्रीक विश्लेषनाव्दारे अंबादास सोनाजी होंडे व अजित कैलास शेंडगे यांनी जेसीबी चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन देवीदास शिवाजी वाकडे व सागर शिवाजी वाकडे यांच्या सांगण्यावरून सदरचा जेसीबी चोरला असल्याची कबूली दिली आहे. ते पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
सदरची कामगिरी सहा. निरीक्षक मुंडे, अंमलदार रेवननाथ दहीफळे, संदीप घोडके, गणेश साठे, दिलीप शिंदे, अमोल आव्हाड यांनी केली आहे.