माय महाराष्ट्र न्यूज:शिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे लवकरच ‘भाजपा’ ला रामराम करून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.
भाऊसाहेब वाकचौरे यांनी सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभेसाठी शिवसेनेकडून निवडणूक लढविली. राजकारणात नवख्या असलेल्या वाकचौरे यांनी या निवडणुकीत रिपाइंचे नेते
रामदास आठवले यांचा पराभव करून ते खासदार झाले होते. मात्र सन 2014 च्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देवून काँग्रेस पक्षात प्रवेश करुन शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढविली होती.
या निवडणुकीत ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सदाशिव लोखंडे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला.त्यानंतरच्या सन 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने शांत राहण्याचा
निर्णय माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी घेतला.आगामी सन 2024 च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करुन त्यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी
नुकतीच मुंबईत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ‘भाजप’ ला रामराम करुन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच ते उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पुन्हा ‘शिवबंधन’ बांधणार आहेत.
गेल्या चार-पाच दिवसांपासून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे काही पदाधिकारी वाकचौरे यांच्या समवेत वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. माजी शहर प्रमुख सचीन बडधे,
माजी तालुका प्रमुख सदा कराड, बेलापूर खुर्द चे लखन भगत आदींसह अनेक पदाधिकारी त्यांच्या सोबत दिसत आहेत.दरम्यान श्रीरामपूर मधील काँग्रेसचे एक प्रमुख पदाधिकारीही
शिवसेनेच्या वाटेवर असून त्यांनीही नुकतीच मुंबईत जावून उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांच्याही पक्षप्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.