माय महाराष्ट्र न्यूज:देशभरात सक्रिय पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामान विभागाच्या
ताज्या अपडेटनुसार, आज आणि उद्या (14 आणि 15 ऑगस्ट रोजी) राजधानी दिल्लीत (Delhi) विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. आज दिल्लीचे कमाल तापमान 34 अंश
सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय, 16 ऑगस्ट रोजी दिल्लीत हवामान चांगलं असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर प्रदेशातही हलका पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, आज (14 ऑगस्ट रोजी) उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुढील दोन दिवस राज्यात असाच
पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे.IMD च्या ताज्या अपडेटनुसार, 16 आणि 17 ऑगस्ट रोजी राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित जिल्ह्यांत तुरळक
ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरुच आहे. राज्यातील अतिउंचीच्या भागात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात हवामान असेच राहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने पश्चिम बंगाल आणि सिक्कीमसाठी आज (14 ऑगस्ट रोजी) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पडणाख्या पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागाने नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे.
याशिवाय जर, काही अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अशा इशाराही उत्तराखंडमधील नागरिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे.