माय महाराष्ट्र न्यूज:आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 40 ते 45 जागा विरोधकांच्या महाविकास आघाडीला मिळतील, असा दावा एका अंतर्गत सर्व्हेक्षणात
करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शिंदे – पवार – फडणवीस यांच्या नेतृत्वातील ट्रिपल इंजिन सरकारला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाली. त्यानंतर ते आपल्या
सहकाऱ्यांसह शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक अंतर्गत सर्वेक्षण केले होते. त्यात राज्यातील सर्वच 48 लोकसभा मतदार संघात जाऊन आढावा घेण्यात आला.
त्यात सत्ताधारी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) जबर झटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणानुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस,
राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीचा 40 ते 45 जागांवर विजय मिळेल.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याविषयी बोलताना म्हणाले की, या सर्व्हे अंतर्गत आम्ही 48 मतदारसंघात जाऊन तेथील
विद्यमान राजकीय स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यानुसार आम्ही प्रत्येक वॉर्डात तयारी सुरु केली आहे. राज्यातील सर्वच भाजपविरोधी पक्षांना आम्ही सोबत घेऊ. आम्हाला भाजपला सर्व पातळ्यांवरुन बेदखल करायचे आहे.
यावेळी त्यांनी शरद पवारांविषयी काँग्रेसमध्ये नाही तर जनतेत संभ्रम असल्याचेही स्पष्ट केले. शरद पवार मोठे नेते आहेत. ते निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्यांनी अजित पवारांच्या भेटीवरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते विरोधी पक्षांच्या
इंडिया आघाडीसोबत राहणार आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांच्याविषयी कोणताही संभ्रम नाही. पण जनतेत नक्कीच संभ्रम आहे, असे नाना पटोले म्हणाले.