माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यात राज्यातील एका बड्या
नेत्यानं या दोन्ही नेत्यांसंदर्भात मोठा दावा केला आहे. शरद पवार आणि अजित पवार हे भविष्यात एकत्र येऊ शकतात, असं भाकित या नेत्यानं केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील
राजकारणाची चर्चा देश पातळीवरही सुरू आहे. अजित पवारांचा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा, शपथविधी, खातेवाटप आणि आता शरद पवार आणि अजित पवार यांची भेट हे मुद्द्यांची जोरदार
चर्चा सुरू आहे. त्यात दिल्लीतून शरद पवारांना ऑफर असल्याचा दावा राज्यातील काँग्रेसच्या नेत्याने केल्यानं खळबळ उडाली होती. मात्र, अशा चर्चांना काही अर्थ नाही, असं आधीच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दुसरीकडे, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही भेट आणि सध्याची राजकीय परिस्थिती यावर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे. शरद पवारांबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘समुद्राची खोली
मोजता येईल; मात्र शरद पवार यांची बुद्धी मोजता येत नाही. भाजप शरद पवार यांना आपल्या दबावाखाली ठेवणार की शरद पवार हे भाजपला दबावाखाली ठेवतील हे सांगता येत नाही.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार
हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीची पुढची दिशा काय असेल, याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. यावरही बच्चू कडू यांनी महत्वाचं भाष्य केले आहे. उद्या महाविकास आघाडीमधील
कोण गळाला लागतील हे काही सांगता येत नाही. अजित पवार यांच्यामुळं शिंदेंचे राजकीय वजन कमी होईल, असे वाटत होते, पण आता शिंदेच पुरून उरत आहेत, असे कडू म्हणाले.
सत्तेत राहायचे असेल तर सर्वांना व्यवस्थित राहावे लागेल. आजच्या मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला बोलावले नाही. फक्त मंत्र्यांनाच निमंत्रित केले आहे. असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.