माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत.राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने शिवसेनेने (ठाकरे गट) मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील
४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी मातोश्रीवर दररोज वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी हजेरी लावताना दिसत आहेत. गुरुवारी मातोश्रीवर
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची बैठक संपन्न झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अहमदनगरच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे असे एका वृत्तपत्राने वृत्त प्रसिद्ध केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघात आपल्याला सुजय
विखे-पाटील यांचा पराभव करायचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.या बैठकीत नगर जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा जागा लढायच्या याबाबत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विचारणा केली. या लोकसभा
जागेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी असो आपल्याला एकत्र मिळून ही निवडणूक लढायची आहे. त्या उमेदवाराला साथ द्यायची आहे. सुजय विखे पाटलांचा पराभव आपल्याला करायचा आहे, तयारीला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे
यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. नगर जिल्ह्यात नगर आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदार संघात १२ विधानसभा मतदारसंघ आहेत. अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव-पाथर्डी, राहुरी, पारनेर,
अहमदनगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड एवढे विधानसभा मतदारसंघ नगर जिल्ह्यात आहेत. या सर्व ठिकाणी कशाप्रकारे मोर्चेबांधणी करायची, याची रणनीती मातोश्रीवरील आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आली.