माय महाराष्ट्र न्यूज:श्रावण महिना सुरू झाला आहे. यंदा चातुर्मासात श्रावण महिना अधिक असल्यामुळे आता निज श्रावण महिन्यात व्रत-वैकल्ये आणि सण-उत्सव साजरे केले जात आहे.
पुढील महिनाभर श्रावणातील व्रत-वैकल्यांची रेलचेल असणार आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. श्रावणी सोमवार, मंगळवार,
बुध-बृहस्पति पूजन, जरा-जिवंतिका पूजन यांसह श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन केले जाते. तसेच नृसिंह पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. अश्वत्थ मारुती पूजन कसे करावे? व्रतपूजनाचा
विधी, महत्त्व, मान्यता आणि व्रतकथा जाणून घ्या…श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा
सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा
वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. षोडषोपचार पूजन करावे. हनुमंताला आवडणारा नैवेद्य दाखवावा. धूप, दीप अर्पण करून आरती करावी. प्रसाद ग्रहण करावा. पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास हनुमंतांचे घरच्या घरी पूजन, नामस्मरण करावे, असे म्हटले जाते.
शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो, असा समज आहे. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला
निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला. पुढे ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून बनविली जाई. उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले.