नेवासा/सुखदेव फुलारी
गोदावरी खोऱ्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्राला वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागताहार्य असून या निर्णयाने नाशिक-नगर सह मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या असल्याची प्रतिक्रिया शेवगाव-नेवासा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे पत्रकारांशी संवाद साधताना श्री.घुले पुढे म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार,मंत्री छगन भुजबळ यांनी अलिकडेच पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्राला वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबदची राज्य सरकारची भूमिका जाहिर केलेली आहे.शिर्डी येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोदावरी खोऱ्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातल्या पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्राला वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं सांगितले.
परभणी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागतोय. हे संकट दूर करण्यासाठी आमच्या सरकारने गत काळात वॉटरग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता; परंतु त्याला महाविकास आघाडी सरकारकडून अपेक्षित गती मिळाली नाही. मात्र, आता त्यासाठी आवश्यक असलेल्या २० हजार कोटींसाठी निश्चितच
केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन यांनी दिले.तर बीड येथील सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सध्या मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. धरणांमधील पाणीसाठाही कमी होत चालला आहे. हाच धागा पकडून आगामी काळात पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करू, यासाठी १ लाख कोटी रुपये लागले तरी चालतील, असे आश्वासन दिले आहे,त्यामुळे नाशिक-नगर सह मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील जनतेच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.त्यामुळे या केवळ घोषणाच न राहाता कृतित ठरवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणे अपेक्षित आहे.समुद्रात वाहून जाणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे गोदावरी खोऱ्यात वलवावे ही गेल्या २० वर्षा पासुनची आमची मागणी आहे.याकरीता राज्य सरकार व केंद्र सरकार कडे सातत्याने पत्र व्यवहार व जलसंपदा मंत्री यांच्या गाठिभेटी घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
नगर आणि नाशिकचं पाणी मराठवाड्याला मिळणार का ? यावरून २०१८ मध्ये महाराष्ट्राचं राजकारण पेटलं होतं. पाणीप्रश्नावर आंतरराष्ट्रीय राजकारण सुद्धा पेटवू शकते. सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या पाणी वाटपावरून आपल्याला हा अनुभव आहेच. राजकारण आणि नद्या-धरणे तसे हे भिन्न विषय.त्यांचा परस्परांशी संबंध येऊ शकतो, असे कदाचित वाटणारही नाही. पण या नद्या व धरणांच्या पाण्यावरील हक्कावरून अनेक वेळा वाद, संघर्ष निर्माण झाले आणि हा प्रश्न कायम वादाच्या विषय ठरलेला आहेत. निवडणुका आल्या किंवा दुष्काळ आला की या वादाला धार चढते. याचा अनुभव गेल्या तीन वर्षांपूर्वी मुळा व भंडारदरा धरणाच्या हक्काच्या पाण्यावरून नगर व मराठवाड्याचा वाद सर्वसृत आहे.
*तर पाण्याची प्रादेशिक विषमता दूर होईल…*
पावसाची विषमता बघता कुठे महापूर तर कुठे दुष्काळ अशी परीस्थितीत आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी
गोदावरी खोऱ्यात आणून तूट भरून काढली तर पाण्याची प्रादेशिक विषमता दूर होईल.तापी व वैतरणा या पश्चिम वाहिनी नद्या वळवून त्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात सोडल्यास नाशिक, नगर, औरंगाबद, बीड, जालना, परभणी, नांदेड , हिंगोली या जिल्ह्यांना लाभ होणार आहे.
*नाशिक-नगरसह मराठवाडयाला फायदा होईल…*
जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांत चांगले पर्जन्यमान असलेतरी त्या अगोदरचे सलग काही वर्षं जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाल्याने धारणांसह विहीर-बोअरच्या जलपातळीत मोठी घटली. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मिळाले तर भविष्यात कधीच चारा छावण्या, पाण्याच्या टँकरची गरज लागणार नाही. शेती सुजलाम, सुफलाम होईल, उद्योग वाढतील, रोजगार निर्मिती होईल आणि दुष्काळ निवार्णावर पाण्याचे टैंकर, जनावरांचा चारा, रोजगार हमीवरिल रोजगार यावर वारंवार होणारा शासनाचा कोटयावधी रूपयांचा खर्च वाचेल.
– नरेंद्र घुले पाटील
माजी आमदार, शेवगाव-नेवासा
———————————–