नेवासा
एक सप्टेंबर पासून मुळा उजव्या कालव्यातून सुरू होत असलेल्या शेतीसाठीच्या आवर्तन कालावधी दरम्यान कालव्या नजीकचे सर्व वीज रोहित्र बंद करण्याचे निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान विज रोहित्र बंद न करता पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा सामाजिक कार्यकर्ते कॉ.बाबा आरगडे यांनी दिला आहे.
मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास बाबद पत्र लिहून मुळा उजव्या कालव्यातून सुरू होत असलेल्या शेतीसाठीच्या खरीप हंगाम संरक्षित सिंचन आवर्तन कालावधीमध्ये कालव्या नजीकचे सर्व वीज रोहित्र बंद करण्याचे आदेश महावितरण कंपनीला देण्याची शिफारस केली आहे.
या पत्रात मुळा पाटबंधारे विभागाने म्हंटले आहे की, महसूल, पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी झालेली खरीप हंगाम नियोजन बैठक व दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी झालेली टंचाई आढावा बैठकीमध्ये मुळा प्रकल्पाचे सन २०२३ मधील खरीप हंगाम संरक्षित सिंचन आवर्तन दिनांक १ स्प्टेबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरु करण्यात येणार असून सदर आवर्तन सुमारे ३५ दिवस चालणार आहे. वरील आवर्तना दरम्यान अनधिकृत पाणी उपसा पाण्याची चोरी होण्याची शक्यता आहे. टंचाई सदृश्य परिस्थितीत सदर आवर्तनामध्ये पाण्याची बचत करुन कमीतकमी पाण्यामध्ये सिंचन आवर्तन करण्याचे निर्देश आहेत. त्यादृष्टीने पाण्याचा अनधिकृत उपसा होऊ नये म्हणून मुळा उजवा कालवा यांचे कार्यक्षेत्रातील सर्व भागातील विज पुरवठा दि.५ स्प्टेबर २०२३ पासून पुढील २० दिवसांपर्यंत बंद ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.त्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, अहमदनगर यांना विद्युत पुरवठा बंद ठेवणेबाबत आदेश व्हावेत अशी शिफारस केली आहे.
सोबत सिंचन पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या कार्यक्षेत्रातील मुळा पाटबंधारे राहुरी उपविभागातील २७ गावे,घोडेगाव
उपविभागातील ६ गावे,नेवासा उपविभागातील ६३ गावे,नेवासा उपविभागातील ३५ गावे, चिलेखनवाडी उपविभागातील ३५ गावे,अमरापुर उपविभागातील ९१ गावातील कालव्या नजिकचे
विद्युत रोहित्राची यादी जोडण्यात आली आहे.
*रोहित्र बंद करण्या ऐवजी पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई करा*
मुळा उजव्या कालव्यातून सुरू होत असलेल्या शेतीसाठीच्या आवर्तन कालावधी मुळा पाटबंधारे विभागाने सुमारे २० दिवस कालव्या नजिकचे विज रोहित्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय अन्याय कारक आहे.अगोदरच पावसा अभावी शेतीतील पीके करपुन गेली आहेत,विहीर-बोअर मध्ये थोड़े फार पाणी आहे त्यावर पीके जगविन्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत.२० दिवस विज रोहित्र बंद केले तर आहे ती पीके सुद्धा वाया जातील.त्यामुळे रोहित्र बंद न करता
मुख्य कालव्यातून व चारयांमधून पाणी चोरी होत असेल तर
पाण्याची चोरी करणाऱ्याच्या मोटरी जप्त कराव्यात, पाईप फोडावेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.मात्र विज रोहित्र बंद करून इतर सर्व सामान्य शेतकऱ्यावर अन्याय करू नये.विज रोहित्र बंद केल्यास पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासना विरोधात शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.
-कॉ.बाबा आरगडे
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते