नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा यात्रे निमित्त सोमवार दि.४ सप्टेंबर रोजी हजारो भाविकांनी नागेबाबा समाधीचे दर्शनाचा लाभ घेतला आहे.
दरवर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारी श्रीसंत नागेबाबांची यात्रा भरते. सोमवार दि.४ सप्टेंबर रोजी यात्रेच्या दिवशी सकाळी ९ वाजता भेंडा खुर्द मारुती मंदिरापासून श्रीसंत नागेबाबांचे पादुका व गंगेच्या पाण्याच्या कावडींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकी नंतर दुपारी नागेबाबांचे समधीस गंगेच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाला घरी नेण्यासाठी आमटीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.यासाठी ४५ कढई (सुमारे २२ हजार लिटर) आमटी तयार करण्यात आली होती. तसेच मंदिर परिसरात उपस्थित भाविकांना आमटी-भाकरीची पंगत देण्यात आला.सायंकाळी ५ वाजता श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची सवाद्य मिरवणूक झाली.रात्री छबिना मिरवणूक ही झाली.यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.मिठाई,खेळणी,सौंदर्य प्रसाधन,गृह उपोयोगी वस्तू,मनोरंजक खेळांची दुकाने थाटली होती.
माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,माजी जिल्हा परीषद अध्यक्ष विट्ठलराव लंघे, पंचायत समिती च्या माजी सभापती सौ.सुनीताताई गड़ाख,नाशिकचे तहसीलदार राजेंद्र नजन, सहाय्यक निबंधक देवीदास घोडेचोर,सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे आदींनी दर्शनासाठी हजेरी लावली.
मंगळवार दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्रीक्षेत्र आळंदीच्या मीराबाई महाराज मिरीकर यांचे काल्याचे किर्तनाने हरिनाम सप्ताह व यात्रेची सांगता होईल.यावर्षी यात्रेतील कावडी मिरवणुकीसाठी ढोलतासा या पारंपरिक वाद्यांचा वापर केल्याने मिरवणूक शांततेत पार पडली.यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व यात्रा कमिटी सदस्य उपस्थित होते.
दोन दिवस भेंडा गावाचे परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने यात्रेत भाविकांचा उत्साह दिसून आला.नेवासा पोलीस यंत्रणेने यात्रेत उत्तम बंदोबस्त ठेवला होता.
इडा पिडा, टळो बाळाला आरोग्य लाभो—
आपल्या बाळाची करणी धरणी,इडा पीडा टाळावी व उत्तम आरोग्य लाभावे यासाठी महिला भगिनी आपल्या मुलांना श्रीसंत नागेबाबांचे पालखी खाली टाकतात.नागेबाबांच्या पादुका असलेली पालखी खांद्यावर घेणारी व्यक्तीं रस्त्यांवर झोपवलेल्या बाळांना ओलांडून जातात.बाळाच्या अंगावरून बाबांची पालखी गेल्यास इडापीडा टळते असा समज दृढ असल्याने बाळांना पालखीखाली टाकण्यासाठी महिला भगिणींची मोठी गर्दी झाली होती.