माय महाराष्ट्र न्यूज जालना सराटी येथे झालेल्या मराठा समाजातील आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यातील दहिगावने, भावीनिमगाव,
मठाचीवाडी येथे निषेध सभा घेऊन बंद पाळण्यात आला. सोमवार दि.४ रोजी सकल मराठा समाजासह सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. मंगळवार दि.५ रोजी
शहरटाकळी बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना सराटी येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात अनेक महिला, पुरुष व लहान मुले जखमी झाली.
या घटनेबाबत सर्वसामान्य जनतेतून रोष व्यक्त होत आहे. मठाचीवाडी येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्यासह अनेकांनी भाषणातून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला.
भावीनिमगाव येथे निषेध सभा घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. दहिगावनेसह परिसरातील गावांत सोमवारी बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवून व्यावसायिकांनी बंदला प्रतिसाद दिला. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.