माय महाराष्ट्र न्यूज: राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटले असताना आता धनगर समाजही एसटी आरक्षणासाठी आक्रमक झालेला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना
धनगर आरक्षण कृती समितीकडून निवेदन देण्यात आले. त्यावेळी उपस्थित धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळत येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा दिल्या.
त्याचसोबत धनगरांना एसटीमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी केली. विखे पाटलांवर भंडारा उधळताच धनगर कार्यकर्त्यांना मारहाण करून पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचे राजकीय पडसाद उमटू लागलेत.
त्यात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर नाव न घेता टोला लगावला आहे.आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, मल्हारी मार्तंड खंडोबाचा, बिरोबाचा आणि म्हाकूबाईचा भंडारा हा समस्त बहुजन
समाजासाठी आस्थेचे व श्रद्धेचे प्रतिक आहे. याचा आंदोलनासाठी वापर करणे अतिशय अयोग्य आहे. जर हा भंडारा विखे पाटलांवर काहींनी उधळला असेल तर तो खंडोबाचा, बिरोबाचा आशीर्वाद म्हणून कपाळावर लावावा. त्याचसोबत
धनगर बांधवांनी लबाड लांडगा काकाच्या नादी लागू नका अशी बोचरी टीका त्यांनी पवारांवर नाव न घेता केली.तसेच आपण धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या उच्च न्यायालयात लढत आहोत. त्यासाठी
आपण जे काही सांगितले त्याचे वेळोवेळी सहकार्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळत आहे. मल्हारी मार्तंड खंडोबाच्या आशीर्वादाने
नक्कीच आपल्याला यश मिळेल असा विश्वासही भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.