माय महाराष्ट्र न्यूज:सोलापुरात धनगर समाज आरक्षण कृती समितीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबीत असल्यानं
धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी भंडारा उधळला आहे. सोलापूर शासकीय विश्रामगृहात घटना घडली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोलापुरात आले आहेत. आज त्यांच्या
दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. अशातच अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी तिथे येत होते, आपले प्रश्न मांडत होते. ते लोकांची निवेदनं स्विकारत होते. अशातच धनगर आरक्षण कृती समितीच्या
काही सदस्यांनी कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन त्यांना देण्याची विनंती केली. हे निवेदन राधाकृष्ण विखे पाटील स्विकारत असताना कार्यकर्त्यांनी अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो राधाकृष्ण
विखे पाटलांच्या अंगावर उधळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या विखे पाटलांच्या सुरक्षारक्षकांनी आणि उपस्थित पोलिसांनी धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांना अडवलं आणि बाहेर आणलं. कार्यकर्त्यांना थांबवताना त्यांना काही प्रमाणात मारहाणही करण्यात आली.
सध्या पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्थानकात या कार्यकर्त्यांना नेण्यात आलं आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. सरकार केवळ घोषणाच देत आहे, मात्र त्यासंदर्भात
कोणतीही अंमलबजावणी करत नाही, असा आरोप धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांचा आहे. याच मागणीसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं
धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. धनगर समाजाचे आंदोलक शेखर बंगाळे यांनी विखे पाटील यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. ते निवेदन वाचत असतानाच शेखर बंगाळे याने
विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यामुळे विखे पाटील यांच्यासह येथे उपस्थित सर्वच गोंधळले होते.हा प्रकार घडताच तिथेच असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना जोरदार मारहाण सुरू केली. बंगाळे
यांना खाली पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवण्यात आले. त्यावेळी शेखर बंगाळे आणि त्याचे समर्थक येळकोट येळकोट जय मल्हारा आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे,
अशा घोषणा दिल्या. यावेळी विखे पाटील यांनीच त्याला सोडवण्यासाठी निर्देश दिले.