माय महाराष्ट्र न्यूज:नगर बाजार समितीतील भुसार बाजारात बुधवारी (दि. ६) मुगाला पुन्हा एकदा उच्चांकी भाव मिळाला आहे. मुगाचा प्रति क्विंटल १३ हजार ५०० रुपये उच्चांकी दराने लिलाव झाला.
उच्च प्रतिच्या मुगाला एवढा बाजारभाव मिळण्याची ही बाजार समितीतील तसेच महाराष्ट्रातील पहीलीच वेळ आहे. यापूर्वी शेतकर्याचा मूग प्रति क्विंटल १२ हजार ४४० रुपये दराने विकला गेला होता.
भूसार बाजारात सुभाषचंद्र पोखरणा यांचे आडतीवरील लिलावात नगर तालुयातील भोरवाडी येथील किसन खैरे या शेतकर्यांच्या उच्चप्रतिच्या मुगाला प्रति क्विटल १३ हजार ५०० रुपये दर मिळाला. दरम्यान
नगर बाजार समितीचे भुसार बाजारात शेतकर्यांनी ६०० गोण्या मूग विक्रीस आणला होता. त्यास प्रतवारीनुसार ९००० ते १३५०० रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळाल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.
नगर, पारनेर, शिरूर भागातून मार्केटमध्ये मूग येतो. यातही नगर तालुयातील उच्च प्रतीच्या मुगाला भारतातून मागणी आहे. पावसाने दडी मारल्याने आवक घटली आहे. पण भाव १० हजारांच्या पुढे मिळत असल्याने शेतकरी समाधान मानत आहे. मुगाला सध्या चांगला भाव
मिळाल्याने शेतकर्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी नगर बाजार समिती येथे आणून जास्त दराचा फायदा घ्यावा, असे आवाहन सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रमाजी सूळ, संचालक मंडळ व सचिव अभय भिसे यांनी केले आहे. यावेळी संचालक संतोष म्हस्के,
भाऊसाहेब ठोंबे, जी प माजी सदस्य बाळासाहेब गायकवाड सर आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शेतकर्यांना १३ हजार ५०० रूपयांची पट्टी देण्यात आली.