नेवासा(तालुका प्रतिनिधी):—संस्कारक्षम व नीतिमूल्यांचे भान असणारी उद्याची पिढी घडवणे ही आजच्या शिक्षकांसमोरील मोठी जबाबदारी आहे.गुणवंत शिक्षक म्हणून सन्मानीत झालेल्या
शिक्षकांनी अशी पिढी घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन खड़ेश्वरी संस्थानचे महंत गणेशानंदजी महाराज यांनी केले.नेवासा तालुक्यातील नजिक चिंचोली येथील पैस उद्योग समूह व पसायदान अग्रो यांचे वतीने देण्यात येणारे
जिल्हास्तरीय “वै.लक्ष्मणराव पाठक स्मृति गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे” वितरण गणेशानंदजी महाराज यांचे हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.चोवीस बाय सात फूड मॉल सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास जलमित्र व पत्रकार सुखदेव फुलारी, महाराष्ट्र बँक कुकाना शाखेचे शाखाधिकारी अविनाश मते,
जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त निरीक्षक बाबुराव चावरे,पत्रकार देवीदास चौरे,राहुल कोळसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन ४० शिक्षकांचा यावेळी गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना अविनाश मते म्हणाले की, आपला विद्यार्थी मोठा झाला हे ऐकून शिक्षकाचे उर भरून येत असते. आदर्श पिढी घडविन्याचे काम शिक्षक करत असतात. कर्तृत्व गाजायचे कसे हे एक शिक्षकच सांगू शकतो. यशस्वी शिक्षकामुळेच यशस्वी विद्यार्थ्यांचीओळख निर्माण होत असते.
जलमित्र सुखदेव फुलारी म्हणाले,पुरस्काराने प्रेरणा मिळून हाती घेतलेले काम अधिक जोमाने करण्यास बळ मिळते,त्याच बरोबर सामाजिक जबादारी ही वाढते.पुरस्कार म्हणजे आपण काम करत असलेल्या कार्याला समजाने दिलेली पावती असते.
शिक्षकाची नोकरी म्हणजे फक्त उपजीवीकेचे साधन नाही तर आदर्श पीढ़ी घडविन्याचे व्रत आहे.पुरस्कारार्थिनी ही आपले मनोगत व्यक्त केले.प्रवीण गोडसे,बद्रीनाथ मते,रविन्द्र औताडे,शिवाजी पाठक,महादेव घाडगे आदि यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समन्वयक बुथवेल हिवाळे यांनी सूत्रसंचालन केले.पसायदान उद्योग समुहाचे अध्यक्ष शिवाजीराव पाठक यांनी आभार मानले.