नाशिक/प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने २ ऑक्टोबर रोजी पालखेड पाटबंधारे विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे २०२३ यावर्षीचा सिंचननामा प्रकाशित करण्यात येऊन उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापन करणाऱ्या
अधिकारी-कर्मचारी व पाणी वापर संस्थांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
नाशिक येथील मेरीच्या इंजि. पा.कृ.नगरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमास विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक राजेंद्र शुक्ला,लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक महेंद्र आमले,कार्यकारी अभियंते राजेश गोवर्धने,जितेंद्र पाटील, राघवेंद्र भाट व वैभव भागवत, वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेचे संचालक शहाजी सोमवंशी, पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी, लाभधारक व पालखेड पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
पालखेड पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता इंजि. वैभव भागवत यांनी विभागाने वर्षभरात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला . त्यानंतर सिंचन नाम्याचे प्रकाशन होऊन,पालखेड पाटबंधारे विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी तसेच उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापन करणाऱ्या पाणी वापर संस्थांना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
गेली १६ वर्ष सातत्याने सिंचननामा प्रसिध्द करणारा पालखेड पाटबंधारे विभाग हा महाराष्ट्रातील एकमेव सिंचन व्यवस्थापन विभाग आहे.
ही संकल्पना तत्कालिन कार्यकारी अभियंता व आता सचिव (लाक्षेवि) पदाची धुरा सांभाळणारे डाॕ.संजय बेलसरे यांची आहे.
अध्यक्षीय भाषणात
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक इंजि. राजेंद्र शुक्ला यांनी पालखेड पाटबंधारे विभागातील वाघाड प्रकल्प , पालखेड प्रकल्प, ओझरखेड प्रकल्प ,यामध्ये पाणी वापर संस्था आणि शासन यामध्ये जे समन्वयाचे दर्शन घडते व त्यातून शेतकरी व शासन या दोघांनाही याचा फायदा होतो. अशाच प्रकारे महाराष्ट्रातील इतरही सिंचन प्रकल्पांवरती पाणी वापर संस्था स्थापन होऊन त्यांच्यात व शासनामध्ये समन्वय घडल्यास सिंचन क्षेत्र व पाणी वापर याबाबत जागरूकता निर्माण होऊन शेतकरी व शासन दोघांच्याही उत्पन्नामध्ये भर पडणार आहे असा आशावाद व्यक्त केला.
श्री शहाजी सोमवंशी यांनी पालखेड पाटबंधारे विभागामार्फत पाणी वापर संस्थांसाठी करण्यात येत असलेल्या उपक्रमांचे व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गुणगौरवाबाबत गौरव उद्गार काढले.
इंजि. महिंद्रआमले अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक यांनी देखील वाघाड प्रकल्पाला भेटी देणाऱ्या विविध मान्यवरांनी दिलेल्या चांगल्या अभिप्रायांबाबत व वाघाड प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर असलेल्या कार्याची प्रशंसा केली व याच पद्धतीने इतर प्रकल्पांमध्ये त्याचे अनुकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता इंजि.वैभव भागवत, उपअभियंता इंजि. प्रशांत गोवर्धने, इंजि.पवार, इंजि.निलेश वन्नेरे, इंजि.विश्वास चौधरी, इंजि. अभिजित रौंदळ, इंजि.संभाजी पाटील ,सर्व शाखाधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. वृषाली मोहिते यांनी केले. इंजि.संभाजी पाटील यांनी आभार मानले.