माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा कार्यालय राष्ट्रवादी भवनमध्ये राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, बाळासाहेब जगताप, शहर युवक जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसला नगर जिल्ह्यात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या रुपाने एक राज्यमंत्रिपद मिळालं आहे. मात्र, जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार असल्याने आणखी एक मंत्रिपद मिळावं, अशी येथील पक्ष कार्यकर्त्यांची मागणी आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले मंत्रिपद नगर शहराचे
आमदार संग्राम जगताप यांना मिळावे, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरावाद्वारे केली आहे. देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या पदावर वर्णी लागण्यासाठी पक्षाकडून प्रथमच अशी जाहीर मागणी होत आहे.या कार्यक्रमानंतर झालेल्या बैठकीत बाळासाहेब जगताप यांनी हा विषय मांडला.
देशमुख यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी नगरचे आमदार संग्राम जगताप यांना संधी द्यावी असा ठराव मांडला व त्याला शहर जिल्हाध्यक्ष विधाते आणि भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी अनुमोदन दिले.
बाळासाहेब जगताप म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असताना चार विधानसभा सदस्यांमागे एक मंत्रिपद असे सूत्र ठरविण्यात आले होते. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा विधानसभा सदस्य व एक विधान परिषद सदस्य आहेत. असे असूनही केवळ तनपुरे यांना तेही राज्यमंत्री पद मिळाले. हा अहमदनगर जिल्ह्यावर झालेला राजकीय अन्याय आहे.
त्यामुळे जगताप यांना मंत्रिपद मिळावे. जगताप दोनदा आमदार झाले असून महापौरही होते. पक्षाच्या पदांवरही त्यांनी काम केले आहे. सध्या जिल्ह्यात पक्षाचे जे आमदार आहेत, त्यांच्यामध्ये जगताप सर्वांत वरिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावे. राज्यमंत्री तनपुरे व जिल्हाध्यक्ष फाळके यांनी शहर व जिल्ह्यातील
सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भावना श्रेष्ठींपर्यंत पोहोचावी, अशी मागणी जगताप यांनी या वेळी केली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या ठरावाला पाठिंबा दिला.