माय महाराष्ट्र न्यूज: आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषद घेतली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भुमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. सोलापुरात मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या संदर्भात बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी बोलताना घरात बसून, काळे झेंडे दाखवून आंदोलन करायचं नाही.
हे असे मिळमिळत आंदोलन मराठ्यांचं नाही. एखाद्या मंत्र्याची गाडी आली तर दगड घालून काचा फोडल्या पाहिजे, असं वक्तव्य नरेंद्र पाटील यांनी केलंय.ओबीसी समाजाचे नेते त्यांचं राजकीय आरक्षण किंवा पदोन्नतीतील आरक्षण अडचणीत आल्यावर एकत्र येतात.
मग राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतील मराठा नेते गुटखा खावून बसलेत का? असा खोचक सवाल नरेंद्र पाटील यांनी विचारलाय. या मंत्र्यांना लाज वाटत नाही का? तसं असेल तर मग आम्ही मराठा नाही असं तरी जाहीर करा, अशा शब्दात नरेंद्र पाटील यांनी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधलाय.
त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणीही नरेंद्र पाटील यांनी यावेळी केलीय.या बैठकीत माजी मंत्री आणि भाजप नेते सुभाष देशमुखही सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या तरुणांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना पत्र लिहावं असं आवाहन आमदार देशमुख यांनी केलंय.
त्याचबरोबर मोर्चासाठी कोणतंही राजकारण करु नये, सर्वांनी मराठा समाजाच्या पाठिशी उभं राहावं. 58 मोर्चे निघाले त्यावेळी जी सर्वांची भूमिका होती तीच आताही असावी, असं आवाहनही देशमुख यांनी या बैठकीत केलंय.