माय महाराष्ट्र न्यूज:चंद्रपूर जिल्हातील दारूबंदी उठविल्याचा निर्णयाबद्द्ल राज्य सरकारवर दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांचा रोष कायम आहे. बिहारमध्ये दारूबंदीचा प्रयोग यशस्वी होत असताना समाजसुधारकांची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात मात्र
हिरक महोत्सवी वर्षात दारूबंदी उठविण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याकडे लक्ष वेधत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. दारुबंदी उठविण्यामागे मंत्री विजय वडेट्टीवार यांचा दबाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षादरम्यान राज्याच्या सत्ताधारी महाविकास आघाडीतर्फे मंत्रिमंडळाने घेतलेल्या चंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. तो निर्णय रद्द करावा अशी मागणी करीत आहोत. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या तीन जिल्हांमध्ये दारूबंदी लागू आहे..
त्यामध्ये गडचिरोली व चंद्रपूर जिल्हाची दारू बंदी करण्यासाठी व्यसन विरोधी भूमिका घेवून अनेकांनी संघटीतपणे प्रयत्न केले आहेत. समाजातील विविध घटकांच्या दबावामुळे राज्य सरकारला दारू बंदी लागू करावी लागली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हाची दारूबंदी उठविण्यासाठी आग्रही राहिलेले आघाडी सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची हट्टाहासी भूमिका आहे. त्यांच्या पुढाकाराने प्रथम
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षेतेत आणि नंतर राज्याचे माजी प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षेतेखाली बंदी उठविण्यासाठी सुनियोजित प्रयत्न केले गेले आहेत. या सगळ्या कार्यवाही मागे विशिष्ट हेतू आणि मोठ्या पातळीवरचे आर्थिक हित संबंध करणीभूत आहेत, अशी सर्वत्र चर्चा आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हामधून शंभरपेक्षा जास्त संस्था, संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी यांच्या सामूहिक संघटीत सहभागाने ही भूमिका घेतल्याची माहिती व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या सदस्य अॕड रंजना पगार-गवांदे यांनी दिली.