माय महाराष्ट्र न्यूज:शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दीर्घकाळ रखडलेल्या नव्या संस्थानच्या नियुक्तीची चर्चा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर वर्णी लागावी म्हणून अनेक राजकीय नेते-कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक प्रयत्नशील आहेत.
तर दुसरीकडे विविध सामाजिक संघटनांनीही संस्थानवर राजकीय व्यक्ती नको, अशी भूमिका घेत सामाजिक क्षेत्रातील नावे पुढे केली आहेत. त्यामुळे यावेळीही संस्थानवर वर्णी लागण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.
संस्थानच्या विश्वस्त मंडळाची मुदत पूर्वीच संपली आहे. त्यामुळे सध्या न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तदर्थ समितीमार्फत कारभार सुरू आहे. संस्थानशी संबंधित अनेक प्रकरणे न्यायालयात आहेत. त्यातील एकाच्या सुनावणीच्यावेळी कोर्टाने नवीन विश्वस्त मंडळ नियुक्तीसंबंधी सरकारला निर्देश दिले आहेत.
शिवाय यावर राजकीय व्यक्तींची वर्णी लावली जाऊ नये, असे निर्दशही आहेत आणि तशी मागणीही विविध संघटनांकडून होत आहे.दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी निवड करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कडे अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते यांनी केली आहे.
परंतु राजकीय आणि सामाजिक पातळीवरून या हालचाली सुरू असताना राज्य सरकारकडून मात्र, अधिकृतपणे प्रक्रिया सुरू झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेता, शिर्डीशी संबंधित प्रत्येक निर्णयला न्यायालयात आव्हान दिले जात आहे. त्यामुळे नव्या विश्वस्तमंडळाच्या बाबतीतही असेच घडण्याची शक्यता गृहीत धरून
सरकार पावले टाकत असावे. एका बाजुला तिन्ही पक्षांचा समतोल राखत राजकीय सोय लावणे आणि दुसरीकडे कोर्टबाजी टाळणे अशी कसरत सरकारला करावी लागणार आहे.