माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील ममदापूर येथील आरोपी राजेंद्र पारखे यास पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर त्याच्या नातेवाईकांनी हल्ला करून धमकी दिल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील चितळी येथे काल रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
या गडबडीत आरोपी तेथूनही पळून जाण्यास यशस्वी झाला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल किशोर सुभाष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 15 ते 17 नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किशोर जाधव हे काल रविवारी पेट्रोलींग करत होते. त्याचवेळी त्यांना लुटमार गुन्ह्यातील हवा असलेला ममदापूर येथील आरोपी राजेंद्र पारखे हा गोंधवणी येथे आला असल्याची खबर मिळाली.
त्यावेळी आम्ही पोलिस आहोत. राजू पारखेला तपासकामी घेण्यास आलो, असे नातेवाईकांना सांगितले असता हे नातेवाईक पोलिसांवर धावून आले. त्यांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. एवढेच नव्हेतर या पोलिसांना त्यांनी मारहाणही केली. तसेच काहींनी दगडफेकही केली. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांच्या खांद्याला व उजव्या पायाला मुका मार लागला आहे. तसेच या दरम्यान आरोपीस पळवून लावले.
यावेळी या नातेवाईकांनी या पोलीसांना खोटी अॅट्रोसिटी व विनयभंगाची केस करू, अंगावर रॉकेल टाकून पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करून तुमच्या नोकर्या घालवू अशी धमकी दिली. या नातेवाईकांना हे पोलिस समजावून सांगत होते. त्यावेळी काही महिलांनी त्यांच्या साड्या फाडून घेतल्या. तसेच एका नातेवाईकाने स्वतःच्या डोक्यात दगड मारून घेतला.
या घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन हे पोलीस पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या नातेवाईकांवर भादंवि कलम 143, 147, 149, 353, 332, 337, 308, 225, 189, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.