माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अगस्ति साखर कारखाना तथा संचालक मंडळ यांच्यावर काही सभासदांनी आरोप-प्रत्यारोप केले होते. हे सर्व आरोप थोतांड असून केवळ संचालक मंडळ आणि चेअरमन, व्हा.चेअरमन यांना बदनाम करुन अगस्ति कारखाना बंद पाडायचे हे षड़यंत्र आहे.
खरंतर ज्यांनी साधी पिठाची गिरणी काढली नाही. त्याने कारखाना कसा चालवायचा, हे आम्हाला शिकवू नये आणि जर कोणाची कारखाना चालवायची पात्रता असेल तर मी तुम्हाला हात जोडतो, त्याला माझ्याकडे घेऊन या, मी देखील राजिनामा देतो आणि त्यांच्या स्वाधिन कारखाना देतो. दुर्दैवाने २००२ साली मी कारखाना विरोधकांच्या ताब्यात दिला.
मात्र, दोन वर्षे तो बंद पडला, नंतर तो उभा करायला किती त्रास झाला सगळ्या तालुक्याने पाहिले आहे. त्यामुळे, त्रोटस सभासदांनी राजकारण करुन काड्या घालायचे काम बंद केले पाहिजे. कारण, कारखाना म्हणजे काही पोरखेळ नाही. उठसुठ उठायचे आणि दिवसरात्र आरोप करीत सुटायचे. यांच्या डोक्यात काय शिजतय हे ओळखलं पाहिजे.
की, कारखाना बंद पाडायचा आणि त्याचे खाजगिकरण करुन तो विकत घ्यायचा. मात्र, ही तालुक्यातील जनता खपवून घेणार नाही. अशा प्रकारचे खडेबोल माजी मंत्री तथा मधुकर पिचड यांनी बी. जे.देशमुख यांचे नाव न घेता सुनावले.दरम्यान सततच्या आरोपांनी त्रस्त झालेल्या अगस्ती कारखान्याच्या सर्व संचालकांनी आपले संचालक पदाचे राजीनामे आज कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेकडे सुपूर्द केले.
अगस्ती कारखाना कार्यस्थळावर संचालक मंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पिचड म्हणाले, ‘अगस्ती सहकारी साखर कारखाना मी हयात असेपर्यंत मोडू देणार नाही, ज्यांच्यात धमक असेल ‘त्या’ वीरांनी समोर यावे आणि जनताच आमच्या बाजूने कौल देईल’ असा ठाम विश्वास व्यक्त करत, ‘
आपण ही या पदावर राहण्यास उत्सुक नाही’ असा टोला विरोधकांना लगावला. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सीताराम पाटील गायकर यांचेसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.