माय महाराष्ट्र न्यूज :आजपासून म्हणजे 15 जूनपासून गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही जर सोनेखरेदीचा विचार करत असाल तर या संबंधातील नियम तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.
केंद्र सरकारने असा निर्णय घेतला आहे की, 15 जूनपासून देशात केवळ बीआयएस हॉलमार्किंग असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री होईल. आजपासून अशाप्रकारचे दागिने विकणं ज्वेलर्ससाठी अनिवार्य असेल.
गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य करण्याबाबत सरकार गेली दीड वर्ष योजना आखत आहे आणि आजपासून हा आदेश संपूर्ण देशात लागू होणार आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सरकारने हॉलमार्किंग अनिवार्यता लागू करण्याची तारीख पुढे ढकलली होती.
मात्र आता देशात केवळ हॉलमार्किंग असणारीच ज्वेलरी विकली जाईल. सोन्याच्या शुद्धतेबाबत होणारी फसवणूक कमी करण्यासाठी हा निर्णय फायद्याचा ठरेल, असं जाणकारांचं मत आहे.
गोल्ड हॉलमार्किंग काय आहे?
केंद्र सरकारने अशी माहिती दिली आहे की, गोल्ड हॉलमार्किंग देशातील सर्व सोने व्यापाऱ्यांना त्यांच्यकडील दागिने किंवा इतर कलाकृती विकताना लागू होईल. त्यांना बीआयएस स्टँडर्डचे मानक पूर्ण करणं आवश्यक असेल, तसं न केल्यास कठोर कारवाई देखील होऊ शकते.
सोन्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही फसवणूक केल्यास 1 लाखापर्यंत किंवा त्या दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड आकारला जाऊ शकतो. शिवाय बीआयएस कायदा, 2016 च्या सेक्शन 29 अंतर्गत 1 वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो.
तपासणीसाठी सरकारने BIS-Care असं App देखील लाँच केलं आहे. यामध्ये शुद्धता तपासण्याबरोबरच तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता. याठिकाणी तुम्हाला हॉलमार्किंग संबंधातील तक्रारी नोंदवता येती.