माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगरमध्ये अवघ्या 6 महिन्याच्या मुलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
शिर्डी येथे राहणाऱ्या कोरके यांच्या कुटुंबातील सहा महिन्याच्या श्रद्धा कोरके या मुलीला कोरोनाची लक्षणे असल्याने तिच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते. मात्र उपचाराअंती चिमुरडीने कोरोनावर मात केली. कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला होता.
पण म्युकरमायकोसीसची लक्षणे दिसून आली. त्यामुळे कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली.व्हेंटिलेटवर असणाऱ्या श्रद्धाला लोणी येथील प्रवरा हाॉस्पिटलमध्ये 13 तारखेला दाखल करण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली तिच्यावर उपचार सुरू केले. मात्र उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
म्युकरमायकोसीस जास्त प्रमाणात पसरल्याने तिच्यावर सर्जरी करणंही शक्य नव्हतं. अथक प्रयत्नांनंतरही डॉक्टरांना अपयश आले आणि तीचा आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला.एवढ्या लहान मुलीला म्युकरमायकोसीस होण्याची आणि त्यात मृत्यू होण्याची कदाचित राज्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे पालकांनी काळजी घेण्याचं आवाहन डॉ. भालवार यांनी केलं.