Monday, May 27, 2024

आता ईडीचा प्रयोग थांबवा, शिंदे गटाच्या खासदाराने भाजपला सुनावले; पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ईडीबद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचा प्रयोग करता कामा नये. आता ईडीचा वापर थांबवा, त्याला लोकं कंटाळली आहेत, चीड निर्माण झाली आहे असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यापूर्वीही गजानन किर्तीकर यांनी अमोल किर्तीकर यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध केला.

आजही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. लोक याला कंटाळली आहेत, त्यामुळे ईडीचा याचा वापर करू नये असे किर्तीकर म्हणाले.महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांचे वडील गजानन किर्तीकर हे विद्यमान

खासदार असून ते मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. महायुतीचा जो उमेदवार जाहीर होईल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असे लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत गजानन किर्तीकर यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले होते. पण काल मात्र एका प्रचारसभेत त्यांनी , त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध केला.

त्याचाच पुनरुच्चार त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेतही केला.शिवसेना उबाठा गटाचे अमोल किर्तीकर यांची खिचडी घोटाळाप्रकरणी ईडी चौकशी सुरू आहे. मात्र त्यामध्ये काहीही हाती लागणार नाही, असे गजानन किर्तीकर म्हणाले. अमोल आणि सूरजवर खिचडी घोटाळ्या संदर्भातील आरोपांचा राग येतो. कोरोना आला तेव्हा सर्व काही तात्काळ हवं होतं. तेव्हा पटापट गरज होती,

तेव्हा पुष्कळसे व्हेंडर आले. त्यापैकी एक संजय माशेलकर आहेत. ते आमच्या शिवसेनेत आहेत, त्यांनी कंपनी स्थापन केली त्यामध्ये अमोल किंवा सूरज भागीदार नाहीत, पण सप्लाय चेनमध्ये त्यांनी जीवावर उदार होऊन काम केलं. त्या कंपनीला प्रॉफिट झालं, त्यानंतर अमोल आणि सूरजला चेकने मानधन मिळालं. ते पैसे बँकेत टाकले, त्यावर इन्कम टॅक्सही लागला. यामध्ये मनी लाँड्रिंग नाही, असं किर्तीकर यांनी स्पष्ट केलं.

भाजपाने यंदा ‘400 पार’ असा नारा दिला आहे. त्यांनी 400 जागांऐवजी संसदच ताब्यात घ्यावी, पण दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा, अशा शब्दात गजानन किर्तीकर यांनी भाजपावर शरसंधान साधले होते. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावरही भाष्य केले. भाजपने 400 पारचा नारा दिला, पक्ष 400 पार जाणार आहे,

मग इतर गोष्टी कशाला हव्यात असं मी म्हटलं आहे. मित्र पक्षाला जो वाटा आहे तो मिळाला पाहिजे, असं माझं अजूनही म्हणणं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम अधोरेखित झालं पाहिजे, असे किर्तीकर यांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!