मुबंई
‘धर्माच्या राजकारणाने सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय नुकसान होत असल्याने समाज परिवर्तनाची महत्वाची जबाबदारी महा. अंनिसवरआहे’,असे प्रतिपादन प्रख्यात कवयित्री नीरजा यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे दि.२४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या बुवाबाजी विरोधी राज्यस्तरीय महिला परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महा अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे होते.
परिषदेचे उद्घाटन अनोख्या प्रतिकात्मक पद्धतीने करण्यात आले. उद्घाटक नीरजा आणि अन्य मान्यवरांनी अंधश्रद्धेच्या पिंजऱ्यात अडकलेल्या भारतीय महिलेची पिंजऱ्याच्या एकेक कड्या सोडून मुक्तता केली आणि त्याच कड्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या कड्या बनून भोंदूबुवाच्या समोर पडून तो तुरुंगात जातो अशी संकल्पना यामागे होती. अशा प्रकारे एखाद्या कार्यक्रमाचे अभिनव पद्धतीने उद्घाटन करण्याची अंनिस ची परंपरा राहिली.
प्रा नीरजा पुढे म्हणाल्या की,’१९६० – १९७० च्या दशकात माणसे अधिक चौकस होती. चंद्रावर माणूस गेल्यावर संकष्टीचा उपवास सोडून देणाऱ्या वृद्धा अस्तित्वात होत्या. पण आता प्रश्न विचारणे अवघड झाले असून भोंदू बुवा बाबांकडे महिलांनी जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ते रोखले पाहिजे, महिलांनी कर्मकांड आणि दैवादावर विश्वास न ठेवता आपलं मन, मेंदू आणि मनगटाच्या जोरावर समाजामध्ये वावरण्याची आणि महाराष्ट्राचे पुरोगामित्व जपण्याची गरज आहे.
महा.अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अत्यंत अल्पशिक्षित असलेल्या भोंदूबूवांकडून आयआयटी संस्था सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतलेले लोकही फसवले जातात ही शोकांतिका आहे असे प्रतिपादन केले. बुवाबाजीमुळे राज्याची अप्रतिष्ठा होते असेही मत त्यांनी व्यक्त केले. महिला आणि युवतींनी हा लढा व्यापक करावा आणि शोषणमुक्त तसेच समता युक्त महाराष्ट्र घडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख पाहुण्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या संघटनेची माणसे खरे काम करणारे आहेत असे कौतुक केले. अंकशास्त्राच्या छद्मविज्ञानावर टीका करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर त्यामुळे माणसाचे आयुष्य होऊ शकत असेल तर आपल्या देशाच्या नावाचे स्पेलिंग पण आपल्या देशाच्या समस्या दूर करण्यासाठी बदलणार का? अंनिसच्या वेगवेगळ्या संघटना असल्या तरी आपला मुद्दा एकच म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन हाच असल्याने आपण सर्वांनी एकमेकांना मदत करून हे कार्य पुढे नेले पाहिजे. तसेच त्या जेव्हा सोशल मीडियावर अंधश्रद्धेच्या विरोधात लिहितात तेव्हा त्यांचे जे भयानक ट्रोलिंग होते त्याकडेही लक्ष दिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दत्ता बाळ सराफ, महा.अंनिसचे राज्य अध्यक्ष माधव बावगे, उपाध्यक्ष शामराव अण्णा पाटील, बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह अॅड रंजना गवांदे, अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, प्रधान सचिव विनायक सापा, शशिकांत गायकवाड, डी.वाय.शिरसाठ डॉ.अशोक गावित्रे, अशोक गवांदे, अनिता सापा यांच्यासह महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतून सुमारे ६०० प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रथम सत्राचे सूत्रसंचालन आरती नाईक यांनी केले. गायत्री आडे यांनी आभार मानले.
*दुसरे सत्र…*
परिषदेच्या दुसऱ्या सत्रामध्ये ‘बुवाबाजी:बळी स्त्रियांचा, एक मानसशास्त्रीय विश्लेषण’ या अनुषंगाने ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर आणि डॉ.अनिल डोंगरे यांनी महिलांच्या मानसिकतेचा आणि भोंदूबावांनी उठवलेल्या गैरफायद्याचा समाचार घेतला. मनुस्मृतीने लादलेल्या अन्यायकारक बेड्या तोडून महिलांनी विवेक आणि तर्काच्या आधारावर मार्गक्रमण करावे असे त्यांनी प्रतिपादन केले. पीडितांच्या पुनर्वसनासाठी समितीने कार्यरत राहण्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन दोन्ही वक्त्यांनी केले. या सत्राचे सूत्रसंचालन कविता मते यांनी केले.
परिषदेच्या तिसऱ्या सत्रामध्ये प्रियांका खेडेकर, हरी आवळे, शीतल वसावे, गौरी जाधव यांनी ‘जेन-झी टॉक ऑन बुवाबाजी’ या परिसंवादामध्ये तरुणाईच्या भूमिकेतून रंगलेल्या या परिसंवादाने तरूणाईच्या मनातील खदखद समोर आली. जेन झीच यावर उपाय शोधेल आणि समाज विचारप्रवण करेल असा सूर आळवत हा परिसंवाद संपन्न झाला.
परिषदेच्या समारोप प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते यांनी चित्रपट अथवा नाटकाद्वारे प्रसारित होत असलेल्या अंधश्रद्धा विषयक कार्यक्रमांच्या बाबतीत कलाकार आणि प्रेक्षक या दोघांनीही सजग असले पाहिजे असे प्रतिपादन केले. असुरक्षितता, अस्वस्थता आणि भय या अंधश्रद्धांना बळी ठरणाऱ्या घटकांचा महिलांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मुकाबला करण्याची आवश्यकता आहे तसेच पुरुषप्रधान मानसिकता बदलून समान पातळीवर वाटचाल करण्याची आज गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतामध्ये महा. अंनिसचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्यभर राबवत असलेल्या बुवाबाजी विरोधी अभियानाचा आढावा घेतला .आभार यशवंतराव चव्हाण सेंटरचे कार्यक्रम अधिकारी दत्ता बाळसराफ यांनी केले.
*सहा ठराव मंजूर…*
समोरोप सत्रा प्रसंगी सहा ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने जादूटोणाविरोधी कायद्याची नियमावली तयार करणे, केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी जादूटोणाविरोधी कायद्या अमलात आणावा आणि २०२७ मध्ये संपन्न होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा खर्च कमी करून तो निधी दुष्काळ निवारणासाठी वापरावा या मागण्या करण्यात आल्या.
परिषदेमध्ये अनिल करवीर आणि साथींनी प्रबोधन गीते सदर केली. प्रवेशद्वाराच्या ठिकाणी विविध कलाकृतींद्वारे समितीची आजपर्यंतची वाटचाल अत्यंत कल्पकपणे अधोरेखित करण्यात आली होती.
सदरच्या परिषदेच्या संयोजनासाठी महा अंनिस चा बुवाबाजी संघर्ष विभाग आणि महिला सहभाग विभाग तसेच कोकण विभागातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


