Thursday, November 26, 2026

नवीन पुलासोबतच बंधारा ही बांधणार

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई

राज्यातील पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी यापुढे नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक पुलासोबत पूलवजा बंधारा उभारून नदी-नाल्यांमध्ये किमान एक मीटर पाणी अडविणे बंधनकारक करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच ‘व्हीबी-जी रामजी’ योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत पीक-पाणी परिस्थिती, जलसाठे, पाणीपुरवठा, चारा उपलब्धता आणि शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचा आढावा घेण्यात आला. जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या तलावांतील गाळ रस्ते आणि महामार्गांच्या बांधकामासाठी वापरण्याबाबत राज्य व केंद्र शासनादरम्यान सामंजस्य करार करण्यात येणार आहे. ‘गाळमुक्त धरण’ अभियानाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, काढलेला सुपीक गाळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. फार्मर आयडीअभावी मदतीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मदत मिळावी, यासाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, वीजजोडणीअभावी रखडलेल्या योजना मार्गी लावणे आणि धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांत चारा छावण्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

जलसाठे वाढविणे, पाणीटंचाईवर उपाययोजना करणे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले.

या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, संबंधित विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!