नेवासा/प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर भास्कर तारडे यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम 4 अन्वये जन्मठेप, आजन्म सश्रम कारावास, भादवी कलम 363 अन्वये सात वर्ष सश्रम कारावास, भादवि कलम 506 अन्वये 01 वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुपये द्रव्य दंडाची तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास डीवायएसपी संदीप मिटके, उपनिरीक्षक मनोज मोंढे, स.पो.नि. ज्ञानेश्वर थोरात यांनी केला होता.
घटनेची थोडक्यात हकीकत, नेवासा (जि. अहिल्यानगर) दि. ७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पीडिता व तिची आई घरी असताना आरोपी ज्ञानेश्वर भास्कर तारडे हा त्यांच्या घरी आला. पीडितेच्या आईने आरोपीस पीड़िताला कॉलेजला सोडण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी व पीडिता मोटरसायकलवर कॉलेजकडे निघाले. कॉलेजसमोर आल्यानंतर पीडितेने मोटरसायकल थांबवून कॉलेजमध्ये जायचे असल्याचे सांगितले. मात्र आरोपीने मोटरसायकल न थांबवता तिला अहिल्यानगर–संभाजीनगर रोडवरील लॉज येथील खोलीत नेले. तेथे आरोपीने, “तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे,” असे सांगून पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. तसेच या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास पीडिता व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पीडितेची आई कॉलेजमध्ये मुलीला घेण्यासाठी आली असता आरोपी व पीडिता मोटरसायकलवर येताना दिसले. आईने दोघे कुठे गेले होते, अशी विचारणा केली. संशय आल्याने पीडितेच्या आईने नेवासा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गु. र. क्. 801/2022 भा. द.वि. (कलम ३६३) अपहरण गुन्हा दाखल केला.
सदर गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक मनोज मोंढे, स.पो.नि. ज्ञानेश्वर थोरात, डीवायएसपी संदीप मिटके यांनी करून भारतीय दंड संहिता कलम 363, 366(a), 376,376(2), 506,109, 114 पोक्सो कायदा कलम 4,6,8,12,16,17,19,21 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 3(1) (डब्ल्यू) ,3(2)(v)(a), 3(2)(5) नुसार सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयीन सुनावणी दरम्यान पीडिता, पीडितेची आई, वैद्यकीय अधिकारी डॉ. बागवान, स्त्री रोग तज्ञ डॉ.कटारिया न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा सहाय्यक संचालक कुडेकर , जन्मनोंदणी अधिकारी व तपास अधिकारी उपनिरीक्षक मनोज मोंढे, स.पो.नि. ज्ञानेश्वर थोरात, डीवायएसपी संदीप मिटके साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. तसेच वैद्यकीय तपासणी अहवाल, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा ( FSL) अहवाल व हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल हे निर्णायक पुरावे ठरले. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड.श्री.एम.एस.काळे यांनी युक्तिवाद केला. एएसआय नरेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल भगवान वाघमोडे महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती तडुळकर यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व सबळ पुरावे लक्षात घेता विशेष न्यायाधीश श्री.आर.आर.हस्तेकर साहेब विशेष न्यायालयाने आरोपी ज्ञानेश्वर भास्कर तारडे यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम 4 अन्वये जन्मठेप, आजन्म सश्रम कारावास, भादवी कलम 363 अन्वये सात वर्ष सश्रम कारावास, भादवि कलम 506 अन्वये 01 वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुपये द्रव्य दंडाची तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद शिक्षा सुनावली आहे.


