Wednesday, May 20, 2026

अहिल्यानगरला घुमला सामुदायिक पसायदान सोहळ्याचा गजर

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसा निमित्त अहिल्यानगर येथील बंधन लाॅन्सवर झालेल्या सामुदायिक पसायदान पठण कार्यक्रमात पाच हजारांहून अधिक साधक व भाविकांनी एका सुरात सादर केलेल्या पसायदानाने परिसर दुमदुमून गेला होता. नेवासा येथील संत ज्ञानेश्वर संस्थान मधील शंभरहून अधिक वारकरी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व कात्रड येथील कृष्णाई गुरुकुलच्या वारकरी मुलींचा सहभाग लक्षणीय ठरला.

सोहळ्याच्या प्रवेशद्वारात अहिल्यानगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांनी उपस्थित भक्तांना तिलक व महिलांना हळदीकुंकू लावत स्वागत केले.

नेवासा येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक, वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के,महंत आदिनाथ महाराज शास्री व दिनेश्वर महाराज यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पुतळ्याचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय भजन गायक विक्रम हाजरा, ज्ञानेश्वर महाराज कराळे, अहिल्यानगरचे उपमहापौर धनंजय जाधव, सोनई येथील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले उपस्थित होते.

सुरुवातीला उध्दव महाराज यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. म्हस्के महाराज व आदिनाथ महाराज यांचे शुभेच्छापर भाषण झाले. सर्वांनी श्री श्री रविशंकर यांच्या कार्याचा गौरव केला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भजन गायक विक्रम हाजरा स्वरमयी भजन उत्सव कार्यक्रम झाला.
कृष्णाई गुरुकुलच्या तेजस्वीनी महाराज नवले, उपमहापौर धनंजय जाधव, सुनिल सदाफळ, विजय वाकळे, गौतम मुनोत, प्रकाश लोंखडे, डाॅ. तानवडे आदी उपस्थित होते. शहर व जिल्ह्य़ातील पाच हजारांहून अधिक साधक व भाविक उपस्थित होते. मोबाईलच्या लाईटवर करण्यात आलेला दीपोत्सव लक्षवेधी ठरला. श्री श्री रविशंकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन स्वरमयी भजन उत्सव कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत संपन्न झाला. महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!