Thursday, May 21, 2026

पसायदानात ईश्वरनिष्ठ सज्जनांच्या अखंड भेटीची अपेक्षा-गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow
भेंडा/नेवासा
जगात सर्वत्र मांगल्याचा वर्षाव करणाऱ्या संत आणि ईश्वरनिष्ठ सज्जनांचे समूह या पृथ्वीवर अविरतपणे जन्म घेवोत आणि ते अखंडपणे सर्वसामान्य प्राणिमात्रांना प्रेमाने भेटत राहोत अशी अपेक्षा ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामधून केली आहे असे प्रतिपादन  गंगापूर येथील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे  प्रमुख महंत गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे श्रीसंत नागेबाबा भक्त निवासाचे प्रांगणात नागेबाबा परिवार, नागेबाबा देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने आयोजित केलेल्या पसायदान चिंतन सोहळ्यात मंगळवार दि.१९ मे रोजी
तिसऱ्या दिवसाचे पसायदान निरूपण करतांना गाथामूर्ती राऊत महाराज बोलत होते.
वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूतळीं । भेटतु या भूतां ll
पसायदानातील या ओवीचे निरूपण करतांना गाथामूर्ती राऊत महाराज पुढे म्हणाले की,वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी। अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ॥” ही ओवी ज्ञानेश्वरीच्या पसायदानाचा खरा आत्मा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीत संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा आणि शांतीचा दिव्य विचार मांडला आहे. 
वर्षत सकळमंगळी  म्हणजे  सर्व प्रकारच्या मांगल्याचा (पावित्र्य आणि कल्याणाचा) वर्षाव करणारे, मार्गदर्शन-उपदेश करणारे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी  म्हणजे ईश्वरभक्तीत लीन असणाऱ्या सज्जन संतांचे समूह. अनवरत भूमंडळी म्हणजे या पृथ्वीतलावर अखंडितपणे-नित्य. 
भेटतु भूतां म्हणजे सर्व प्राणिमात्रांना सतत भेटत राहोत.
आपले कर्तव्य-कर्म निष्ठेने व प्रामाणिकपणे करणे याला स्वधर्म म्हणतात. वेदाने कर्तव्याची निश्चिती केलेली आहे.जबाबदारीने कर्तव्य म्हणून केलेले कार्य दोष ठरत नाही तर तो स्वधर्म ठरतो. भगवतगीतेला
कर्माचा (कर्तव्याचा) त्याग मान्य नाही, तर धनाचा (आसक्तीचा) त्याग मान्य आहे. काही माणसं आपल्या म्हणण्यालाच कर्तव्य समजतात,कर्तव्य ठरविणाऱ्याला परिणामाचे ज्ञान लागते.
सत्ता-पैसा आला,चार लोक मानायला लागली की माणसं स्वतःला ईश्वर समजायला लागतात. माणसानं आपल्या मर्यादा,ताकद,ज्ञान ओळखले पाहिजे.आपणच आपल्या घाताचे किंवा उद्धाराचे कारण ठरत असतो.
शास्त्राने श्रद्धेचे राजस,तमस आणि सात्विक हे प्रकार सांगितलेले आहे. रजोगुणी आणि तमोगुणी  श्रद्धेने केलेले कर्म पाप निर्माण करते ते कर्म करणाऱ्याच्या दुःखाचे कारण ठरते.
स्व-धर्माचे अनुष्ठान करून चित्त शुद्ध केले तर सर्व इच्छा पूर्ण होतात. संतांनी सुखाची दुकाने मांडलेले आहेत, देव रुपी माल त्यांच्या दुकानात असतो कितीही वाटला तरी पोती कधीच रिकामी होत नाहीत. स्वधर्मरूपी सूर्याच्या प्रकाशात  ईश्वरनिष्ठ असलेल्या संतांचा समुदाय या भूमंडलामध्ये सर्वांना भेटत जावो अशी अपेक्षा ज्ञानेश्वरांनी केलेली आहे.
परमात्मा हा मंगल स्वरूप आहे. त्याची प्राप्ती त्याच्या साधनाने होते ते साधन ही मंगलस्वरूप असावी गृहस्थ जीवन हे भगवंत प्राप्तीचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, त्यामुळे गृहस्थाश्रमाच्या प्रवेशाला सुद्धा शुभमंगल असे नाव दिले जाते. या विश्वामध्ये जे काही मानव आहेत त्या सगळ्यांना ईश्वरनिष्ठांची अनवरत अखंड असे भेट मिळावी,त्यांचा उपदेश-मार्गदर्शन मिळावे. ईश्वरनिष्ठ म्हणजे ज्याचा देवावर विश्वास आहे तो. सध्याचा काळात ‘निष्ठा’ हा शब्द ‘निसटता’ असा झालेला आहे. राजकिय,कौटुंबिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात ही निसटा-निसटी होत आहे. महात्मे हे ईश्वरनिष्ठच असतात, परंतु आपण ज्यांना महात्मे म्हणतो ते ईश्वरनिष्ठ असावेत हा इतकाच भाव या ठिकाणी आहे. साधकीय जीवनात साक्षात्कार होण्यापूर्वी ईश्वरनिष्ठ असणे गरजेचे आहे. ईश्वराच्या ठिकाणी निष्ठा असण्यापेक्षा पैसा-मोठेपणाच्या ठिकाणी निष्ठा असणे ज्ञानेश्वर माऊलींना मान्य नाही. दुसऱ्यावर जेवढे विश्वास ठेवतो, तेवढा देवावर ठेवला तर परमार्थाची वाटचाल खूप पुढे जाईल.
निसर्ग प्रेमी मित्र मंडळाचे कडून उपस्थित भाविकांना आमटी भाकरी महाप्रसादाची पंगत देण्यात आली.
भेंडा गावातील सुवर्णकार संघटनेच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त लेक-जावयांचे पूजन व सन्मान करण्यात येत आहे.
श्रीक्षेत्र देवगड संस्थांनचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरीजी महाराज, चांगदेव महाराज काळे, बाळू महाराज कानडे,गणेश महाराज आरगडे, साहेबराव महाराज गव्हाणे, कुंडलिक महाराज गोरे,गणेश महाराज चौधरी, डॉ.रजनीकांत पुंड, किशोर मिसाळ, नामदेव शिंदे, डॉ.संतोष फुलारी,भारत वाबळे, अशोक पंडीत, वाल्मिक लिंगायत,राम गरड, अशोक गव्हाणे, संजय वायकर, अण्णासाहेब गव्हाणे, सतीश फुलारी, अण्णासाहेब शिंदे,विलास शिरोळे,बाळासाहेब गोरे, दादासाहेब गजरे,सागर पंडित,अवधूत लोहकरे,महादेव पंडित,केशव पंडित यांचेसह नागेबाबा मंदिराचे विश्वस्त, नागेबाबा परिवाराचे सदस्य, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.
*शिक्षणाचे वाटोळे झाले…
शिक्षणाचा संबंध नोकरीशी जोडण्यात आल्याने शिक्षणाचे वाटोळे झालेले आहे. पेपर फोडून शिक्षण घेणारी माणसं समाजाचा काय भलं करणार आहेत ? शिक्षित माणसं सुशिक्षित आहेत असं म्हणण्याचं धाडस होत नाही. स्वातंत्र्य पूर्व काळात नाही समाजाची  पिळवणूक झाली आणि आज ही स्वकीयांकडून पिळवणूक होत आहे,त्यात ही शिक्षित माणसाकडूनच जास्त पिळवणूक होत आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते.
गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!