Thursday, May 21, 2026

संत हे कल्पवृक्षांचे चालते-फिरते बगीचे-गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

पौराणिक कल्पवृक्षाकडे आपल्याला स्वतः चालत जावे लागते आणि मग तो इच्छा पूर्ण करतो. परंतु भूतलावरील संत हे असे ‘चालते-फिरते कल्पवृक्षांचे’ बगीचे आहेत की, जे स्वतः लोकांकडे जातात आणि त्यांच्या दुःखाचे निवारण करतात असे प्रतिपादन  गंगापूर येथील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे  प्रमुख महंत गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे श्रीसंत नागेबाबा भक्त निवासाचे प्रांगणात नागेबाबा परिवार, नागेबाबा देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने आयोजित केलेल्या पसायदान चिंतन सोहळ्यात बुधवार दि.२० मे रोजी चौथ्या दिवसाचे पसायदान निरूपण करतांना गाथामूर्ती राऊत महाराज बोलत होते.
चला कल्पतरूंचे आरव । चेतनाचिंतामणीचे गांव।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे
पसायदानातील या ओवीचे निरूपण करतांना गाथामूर्ती राऊत महाराज पुढे म्हणाले की,पसायदानात संत ज्ञानेश्वर महाराज परमेश्वराकडे प्रार्थना करतात की, संत हे चालते-फिरते कल्पवृक्ष आहेत. सामान्य कल्पवृक्षाकडे माणसाला जावे लागते, परंतु संत हे कल्पवृक्षांचे चालते-फिरते बगीचे आहेत. ते स्वतः लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्यापर्यंत जातात आणि त्यांच्या जीवनातील सर्व दुःखे दूर करून त्यांना आनंद आणि ज्ञान देतात.
*चलां कल्पतरूंचे आरव, आरव म्हणजे बगीचा किंवा बाग. संत हे चालणारे सजीव कल्पवृक्ष आहेत. कल्पतरू जशा सगळ्या इच्छा पूर्ण करतो, तसेच संत भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
*चेतना चिंतामणींचे गाव, चिंतामणी म्हणजे मनातली इच्छा पूर्ण करणारा चमत्कारिक मणी. संत हे जणू सजीव चिंतामणींची गावेच आहेत. फरक इतकाच की, ते कल्पनेतील नसून जिवंत आहेत आणि योग्य-अयोग्य काय याचा विचार करून आशीर्वाद देतात.
*बोलते जे अर्णव । पीयूषाचे, अर्णव म्हणजे समुद्र आणि पीयूष म्हणजे अमृत. संत हे अमृताचा बोलणारा महासागर आहेत. त्यांच्या वाणीतून किंवा उपदेशातून नेहमी अमृतासारखे ज्ञान आणि कल्याणकारी विचार बाहेर पडतात, जे ऐकणाऱ्याच्या आयुष्याला तृप्त करतात. 
संत हे समुद्रासारखे परिपूर्ण आहेत, त्यांचे बोलणे अमृता सारखे गोड असते. संत हे आपण केलेल्या अपेक्षा इच्छाच पूर्ण करतात असे नाही, तर आपण ज्याची अपेक्षाही करत नाही अशा ब्रह्मरूपाची प्राप्ती करून देतात.
मानव जन्म दुर्लभ आहे. पाप-पुण्य समान असेल तरच मानव देह मिळतो.
मानवी देहाला क्रांती करता येते, दुःखावर विजय प्राप्त करता येतो. तुकाराम महाराज भगवंताकडे संतांच्या संगतीची मागणी करतात, अनंत कोटयां-कोटी पुण्य पदरी असेल तरच संतांची भेट होत असते. कामधेनू, कल्पतरू आणि चिंतामणी या तीन वस्तुंना माणसाशी इच्छा-अपेक्षा पूर्ण करण्याचे सामर्थ्य आहे. ज्ञानेश्वरांनी ईश्वरनिष्ठांसाठी कल्पतरूची बाग असावी अशी मागणी केलेली आहे, संतांना कल्पतरूची उपमा दिलेली आहे. शांत वृत्तीने, मन स्थिर करून ज्ञानेश्वरीचे अर्थासह चिंतन करा असा उपदेश राऊत महाराज यांनी केला.
आबासाहेब काळे व परिवाराकडून उपस्थित भाविकांना महाप्रसादाची पंगत देण्यात आली. 
रामनाथ महाराज काळेगावकर, संत ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त कृष्णाभाऊ पिसोटे, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक डॉ.शिरीष लांडगे, प्रा.सविता नवले, मुख्याध्यापक संदीप फुलारी, बाबासाहेब भागवत,  डॉ.लहानू मिसाळ, शरद गव्हाणे, रंगनाथ गव्हाणे, बाबासाहेब गायकवाड,देवेंद्र काळे,भाऊसाहेब फुलारी,योगेश लोळगे,ओंकार शेटे, संतोष भामरे,
यांचेसह नागेबाबा मंदिराचे विश्वस्त, नागेबाबा परिवाराचे सदस्य, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.
*तर शेतकरी आत्महत्या कमी होतील…
खरंच शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात असे वाटत असेल तर ज्ञानेश्वरांची “वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।अनवरत भूतळीं । भेटतु या भूतां” ही मागणी पूर्ण व्हावी लागेल. आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानाने राहण्याकरिता संत संगतीची-उपदेशाचे नितांत गरज आहे. संत संगतीमुळे विवेक प्राप्त होतो.
गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत
- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!