भेंडा/नेवासा
विश्वातील सर्व सजीव प्राणिमात्रांमध्ये एकमेकांविषयी सलोखा निर्माण होवो आणि सर्वांच्या मनात एकमेकांसाठी मैत्रीची व प्रेमाची भावना दृढ होवो. पृथ्वी, जल,अग्नी,वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे परस्परांमध्ये सख्य निर्माण व्हावे अशी मागणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मध्ये केलेली आहे असे प्रतिपादन गंगापूर येथील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख महंत गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे श्रीसंत नागेबाबा भक्त निवासाचे प्रांगणात नागेबाबा परिवाराचे वतीने आयोजित केलेल्या पसायदान चिंतन सोहळ्यात सोमवार दि.१८ मे रोजी
दुसऱ्या दिवसाचे पसायदान निरूपण करतांना गाथामूर्ती राऊत महाराज बोलत होते.
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात||
पसायदानातील या दोन ओव्यांवर निरूपण करताना गाथामूर्ती राऊत महाराज पुढे म्हणाले की, पसायदान चिंतन हे आपल्यासाठी करायचे आहे,आपल्या घाताला कारणीभूत असलेला आपल्यातील ‘खळ’ दूर करायचाय आहे. माणसाला सज्जन-दुर्जन ही पदवी जन्माने नव्हे तर त्याच्या कर्माने-कृतीमुळे येत असते. जीवन जगत असताना आपल्या प्रत्येक कृती पासून पाप-पुण्य तयार होत असते. मानवी देह पेरणी सारखा आहे जे पेरलं तेच उगवते.
व्यंकटी सांडो म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल, दुःख होईल, पीडला जाईल अशी वृत्ती-विचार प्रथमत: मनामध्ये तयार निर्माण होते. असा जगाविरुद्ध असणाऱ्या वाकड्या विचारायला व्यंकटी म्हणतात.अशी वृत्ती निघून जावो,नष्ट होवो.
*सत्कर्मी रती वाढो” म्हणजे चांगल्या (सत्) कामांमध्ये गोडी किंवा प्रेम वाढू दे,जीवनात सत्कर्म निर्माण व्हावे.
*भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे*
याचा अर्थ असा होतो की, या विश्वातील सर्व सजीव प्राणिमात्रांमध्ये ज्यामध्ये मानव, प्राणी, पक्षी आणि निसर्गातील प्रत्येक घटक येतो एकमेकांविषयी सलोखा निर्माण होवो आणि सर्वांच्या मनात एकमेकांसाठी मैत्रीची व प्रेमाची भावना दृढ होवो. पृथ्वी, जल,अग्नी,वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे परस्परांमध्ये सख्य निर्माण व्हावे. भौतिक दृष्टीने खूप विकास झालेला आहे, विज्ञानाने जग जवळ आणलेले, पण दुर्दैवाने एकाच कुटुंबातील माणसा-माणसात मैत्रत्व राहिलेले नाही,जिव्हाळा राहिलेला नाही,तो निर्माण व्हावा.
*दुरितांचे तिमिर जावो* याचा अर्थ
दुरित म्हणजे पाप किंवा वाईट कर्म,देवाशी अंतर धरणे,
तिमिर म्हणजे अंधार, अंतःकरणातील
अंध:कार दूर व्हावा. मूर्ती म्हणजे देव नाही, तर ती केवळ प्रतिमा आहे. देव शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. सर्व विकार हे दुरीता मध्ये येतात. ज्ञानोबा निवृत्तीनाथाना म्हणतात की असे ज्ञान द्या, की पापाचा आणि अज्ञानाचा अंध:कार दूर होईल,नष्ट होईल.
*विश्व स्वधर्म सूर्ये पाहो* याचा अर्थ
स्वधर्म सूर्य म्हणजे प्रत्येकाने आपले कर्तव्य किंवा मानवधर्म प्रामाणिकपणे पाळावा, अज्ञानाचा अंधार दूर होऊन, संपूर्ण जग ‘स्वधर्माच्या’ तेजस्वी प्रकाशात न्हाऊन निघू दे.
जो जे वांछील तो ते लाहो,प्राणिजात l
याचा अर्थ संतांनी केवळ एका व्यक्तीचे किंवा धर्माचे कल्याण न मागता, सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाचा विचार केला आहे. संत कोणत्या एका प्रांताचे किंवा
देशाचे नसतात तर ते संपूर्ण विश्वाचे संत असतात आणि विश्व कल्याणाची मागणी करतात.
कलियुगात उद्धाराचा-दुःखावर विजय मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताचे नामजप. नामजपा सारखे सत्कर्म नाही,आपण धन कमवत आहे या धारणेतून नामजप करा असा सल्ला राऊत महाराज यांनी दिला.
शिवाजीराव पाठक व सिद्धांत नवले यांचे कडून उपस्थित भाविकांना महाप्रसादाची पंगत देण्यात आली
*संन्याशी राजा सारखे झालेत…
शास्त्राने सांगितलेले वर्ण आता राहिलेले नाहीत. वर्ण म्हणजे जाती नव्हे. वर्ण जन्मापेक्षा व्यक्तीचे गुण आणि कर्म यावर आधारित आहेत.
वर्ण आश्रमाचे ही सध्या अवघड झालेले आहे, संन्याशी राजा सारखे झालेत आणि राजे (ज्यांच्या हाती राज्य किंवा सत्तेची सूत्रे आहेत) चोरांसारखे झाले आहेत,हा कलियुगाचा प्रताप आहे.
–गाथामूर्ति रामभाऊ महाराज राऊत
जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रमुख राम महाराज झिंजुर्के,तुकाराम मिसाळ, संजय मनवेलीकर, गणेशदेवा कुलकर्णी,बापूसाहेब नजन, देविदास साळुंके,मालोजीराव भुसारी,उद्योजिका मिराताई नवले,अजित रसाळ, आबासाहेब काळे,सुभाष चौधरी, सुनिल गव्हाणे, राजेंद्र चिंधे, संजय नवले,अशोक साळवे, भाऊसाहेब तागड,शिवाजी फुलारी, ऋषिकेश तागड यांचेसह नागेबाबा मंदिराचे विश्वस्त, नागेबाबा परिवाराचे सदस्य,ग्रामस्थ,भाविक उपस्थित होते.





