भेंडा/नेवासा
सद्गुरु निवृत्तीनाथ यांनी प्रसन्न होऊन ज्ञानदेवांना पसायदानातून मागितलेली जगाच्या कल्याणाची मागणी पूर्ण होईल असा आशीर्वाद-प्रसाद दिला. हा आशीर्वाद मिळाल्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज अत्यंत सुखी आणि समाधानी झाले असे प्रतिपादन गंगापूर येथील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख महंत गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे श्रीसंत नागेबाबा भक्त निवासाचे प्रांगणात नागेबाबा परिवार, नागेबाबा देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने आयोजित केलेल्या पसायदान चिंतन सोहळ्यात शुक्रवार दि.२२ मे रोजी ६ व्या आणि शेवटच्या दिवसाचे पसायदान निरूपण करतांना गाथामूर्ती राऊत महाराज बोलत होते.
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें।
दृष्टादृष्टविजयें । होआवें जी l
तेथ म्हणे विश्वेशरावो । हा होईल दानपसावो।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला l
पसायदानातील या ओव्यांचे निरूपण करतांना गाथामूर्ती राऊत महाराज म्हणाले की, ‘आणि ग्रंथोपजीविये’ म्हणजे दुसऱ्याच्या सुखाने सुखी आणि दुःखाने दुःखी होतात त्यांना संत म्हणतात.जो दृष्ट विजयी आहे,त्याला दुःखच होत नाही. संतांनी ग्रंथाला उपजीव्य (आधार) मानलेले आहे.
ग्रंथ वेगळे असले तरी सिद्धांत वेगळे नाहीत. उपजीव्य म्हणजे ज्याच्यावर एखादी गोष्ट किंवा व्यक्ती अवलंबून असते, म्हणजेच ‘आधार’ किंवा ‘स्रोत’ तो आणि उपजीवक: म्हणजे जो आधारावर अवलंबून असतो किंवा आधाराचा लाभ घेतो, म्हणजेच ‘आश्रित’. संताचे ग्रंथ हेच जगण्याचे मुख्य साधन होय. सतत ग्रंथाचे चिंतन करणारे जे सर्व ग्रंथ उपजीवका बरोबरच सर्व जग सुखी व्हावं.
‘दृष्टादृष्टविजयें‘ म्हणजे मानव लोकातील (इयें लोकीं) सर्व लोकांनी ग्रंथांनाच आपले जीवन मानून, आपल्या प्रत्यक्ष (दृष्ट) व्यवहारावर आणि अदृष्ट अशा सर्व संकटांवर अथवा अज्ञानावर पूर्णपणे विजय मिळवावा.
‘येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला’
याचा अर्थ ‘विश्वेश्वर’ म्हणजेच सद्गुरु निवृत्तीनाथ यांनी प्रसन्न होऊन ज्ञानदेवांना पसायदानाचा आशीर्वाद दिला की, मागितलेले हे सर्व विश्व कल्याणाचे वरदान (पसायदान) पूर्ण होईल.” हे वरदान मिळाल्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज अत्यंत सुखी आणि समाधानी झाले. ज्ञानदेवांनी पसायदानात मागितलेल्या ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ ते ‘दृष्टादृष्टविजयें । होआवें जी’ पर्यंतच्या विश्व कल्याणाच्या दहा मागण्या इश्वेश्वर निवृत्तीनाथांनी पूर्ण केलेल्या आहेत.
नागेबाबा परिवाराचे वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाची पंगत देण्यात आली.
सुदाम महाराज आदमाने, रामनाथ महाराज काळेगावकर, उदयन गडाख,तुकाराम मिसाळ, बाळासाहेब नवले, संत ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त कृष्णाभाऊ पिसोटे,कल्याणराव म्हस्के, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक डॉ.शिरीष लांडगे, प्रा.सविता नवले,भाऊसाहेब आगळे, वैभव नवले, नानासाहेब चेडे,अंबादास गोंडे, बापुसाहेब भागवत,भानुदास कावरे, मुख्याध्यापक संदीप फुलारी, बाबासाहेब भागवत, तुलसीदास फुलारी, डॉ.लहानू मिसाळ, शरद गव्हाणे,राजेंद्र तागड, रंगनाथ गव्हाणे, बाबासाहेब गायकवाड, देवेंद्र काळे,भाऊसाहेब फुलारी,योगेश लोळगे,ओंकार शेटे, संतोष भामरे,विश्वास कोकणे, सुरेश भुसारी यांचेसह नागेबाबा मंदिराचे विश्वस्त, नागेबाबा परिवाराचे सदस्य, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.





