Sunday, May 24, 2026

नामचिंतन देवालाही वेडे बनवते-गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

पाप नष्ट होते, पुण्य तयार होते, दोष पळून जातात, चित्तशुद्धी होते आणि संत भेटतात हे नामचंतनाच्या फलित असले तरीही नामचिंतन करणाऱ्याकरिता नामचिंतन देवालाही वेडे बनवते, एवढी ताकत नामचिंतनात असल्याचे प्रतिपादन गंगापूर येथील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख महंत गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे श्रीसंत नागेबाबा भक्त निवासाचे प्रांगणात नागेबाबा परिवार, नागेबाबा देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने दि.१७ ते २३ मे या कालावधीत आयोजित केलेल्या पसायदान चिंतन सोहळ्याच्या सांगता प्रसंगी दि.२३ रोजी गाथामूर्ती राऊत महाराज यांच्या काल्याचे कीर्तनाने झाली,त्यावेळी ते बोलत होते.

पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥१॥
करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥ध्रु.॥२ll
आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥३॥
एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥४॥

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा नामचिंतनाचे महत्त्व सांगणारा अभंग राऊत महाराजांनी किर्तन सेवेसाठी घेतला. या अभंगावर निरूपण करताना राऊत महाराज म्हणाले की, काल्याच्या कीर्तनासाठी काल्याचा महिमा सांगणारा अभंग घेण्याऐवजी नामचिंतनाचा महिमा सांगणारा अभंग का निवडला ? अशी शंका सर्वांच्या मनामध्ये असेल, परंतु नामचिंतनाचा महिमा सांगण्यातूनच काल्याचा महिमा तुकोबारायांनी प्रतिपादित केला आहे असा हा अभंग आहे.
हा अभंग भगवंताच्या नामाच्या गोडीचे आणि संतांच्या-भक्तांच्या निष्कपटी, निर्मळ आणि समतेच्या प्रेमाचे उत्तम उदाहरण आहे.

पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी॥,
श्रीकृष्ण स्वतः भगवंत असूनही, गाई राखणाऱ्या गोपाळांना (गवळ्यांना) पाहून त्यांच्या प्रेमापोटी चक्क त्यांचे उष्टे अन्न (उष्टावळी) आनंदाने खातात.

करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान॥,
ते सर्व सवंगडी (गडी) अखंडपणे नामाचे चिंतन करतात आणि आपल्या मनात सतत ‘कान्होबाचे’ म्हणजेच श्रीकृष्णाचे ध्यान धरतात.

आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥,
श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी (गडी) गायी चारण्यासाठी वनात गेले असताना, तिथे ते विविध खेळ खेळतात. त्या खेळाचा एक भाग म्हणून, गाईंना वळवण्यासाठी आणि त्यांना सांभाळण्यासाठी देव मागे-पुढे धावपळ करत असतात.

एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ll,
सर्व गोपाळ एकत्र येऊन आपापले आणलेले खाद्यपदार्थ एकत्र करतात आणि त्याचा ‘काला’ करून आनंदाने खातात. संत तुकाराम महाराज म्हणतात की, भक्तीमध्ये लीन असणाऱ्या भाविकांना हातात हात घालून, भगवंताच्या नामाचा गजर करत एका ठिकाणी आनंदाने ‘काला’ करायला मिळणे हेच खरे भाग्य आहे.

देव नामचिंतनाने वेडा होतो. बुद्धीचा वापर तिच्या क्षमतेपेक्षा जास्त केला गेला, तर बुद्धी शॉट होते. म्हणून माणसं वेडे होतात. पशु व मानव हे जीवकोटीतले आहेत,देव जीवकोटीतला नाही. देवाचे ज्ञान साधन बुद्धी नाही,तर शुद्ध सत्वात्मक प्रकारची माया आहे. जो जगाला वेड लावू शकतो तो, स्वतः कसा वेडा बनेल. माणूस व्यवहाराच्या विपरीत वागू लागला तर आपण त्याला वेडा म्हणतो.भगवंताला नाम चिंतन आवडते म्हणून दररोज भगवंताचे नामचिंतन करावे .

संत ज्ञानेश्वर संस्थांनचे अध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग, माजी आ.बाळासाहेब मुरकुटे, काशिनाथ नवले,नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूभाऊ काळे,गणेशानंदगिरी महाराज, अंकुश महाराज कादे,गणेश महाराज आरगडे, भगवान महाराज एमगर, जीवडे महाराज, सुभाष औटी, नागेबाबा मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कदम, सरव्यवस्थापक भरत दारुंटे, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय काळे, प्रादेशिक अधिकारी यशवंत मिसाळ,  पोपट जमदाडे, विकास अधिकारी कन्हैया काळे, मालोजीराव भुसारी,भूषण गुरु, उमेश मुंढे, भाऊसाहेब वाघ,अमोल जोगदंड,वजीर शेख, शिवाजी कदम, गोकुळ काळे,
यांचेसह नागेबाबा मंदिराचे विश्वस्त, नागेबाबा परिवाराचे सदस्य, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.

*आमरस-पुरण पोळीचा महाप्रसाद…

पसायदान चिंतन सोहळ्याचे समारोप प्रसंगी झालेल्या काल्याचे कीर्तनानंतर उपस्थित ५००० भाविकांना आमरस-पुरण पोळीचा महाप्रसाद देण्यात आला.
याकरिता लोकवर्गणी मधून ३००० किलो केशर आंब्याचा रस, महिला भाविकांनी घरी तयार करून आणलेल्या ६५०० हजार पुरण पोळी,धोंडे, कुरडई, पापड,बेसनवडी असे पक्वान्नन होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!