Wednesday, July 15, 2026

विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाहीची प्रत्यक्ष प्रक्रिया; ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूलमध्ये ई-व्होटिंगद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवड

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

गुहा (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) : पत्रकार राहुल कोळसे :ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुहा येथे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, मतदान प्रक्रियेचे महत्त्व समजावे आणि भविष्यात सुजाण मतदार घडावेत या उद्देशाने शनिवार, दि. ११ जुलै रोजी हेड बॉय, हेड गर्ल तसेच विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक अत्यंत उत्साहपूर्ण आणि लोकशाही पद्धतीने पार पडली.

या निवडणुकीत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण ४८८ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मतदानापूर्वी तीन दिवस सर्व इच्छुक उमेदवारांनी शाळेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार करून विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या भूमिका व उद्दिष्टे पोहोचविली.

हेड बॉय पदासाठी श्रीकृष्ण कोळसे, रोहित सौदागर आणि अब्दुल शेख हे उमेदवार रिंगणात होते. तर हेड गर्ल पदासाठी अनुष्का कोळसे, गौरी शेलार, सायशा मुसमाडे, आदिती मुसमाडे, ईश्वरी गागरे, आराध्या काळे आणि समृद्धी शेलार यांनी निवडणूक लढविली.

निवडणुकीसाठी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विशेष मोबाईल ॲपच्या माध्यमातून ईव्हीएम प्रमाणेच गुप्त मतदानाची व्यवस्था केली. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या पद्धतीनुसार राबविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव मिळाला तसेच गुप्त मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळाली.

मतमोजणीनंतर हेड बॉय पदासाठी श्रीकृष्ण कोळसे यांनी २६१ मते मिळवत बहुमताने विजय संपादन केला. हेड बॉय पदासाठी रोहित सौदागर यांना ७७ मते मिळाली. हेड गर्ल पदासाठी समृद्धी शेलार यांनी १६२ मते मिळवत विजय मिळविला, तर गौरी शेलार या १०२ मते मिळवून उपविजेत्या ठरल्या.

याशिवाय विद्यार्थी मंत्रिमंडळामध्ये अथर्व वरगुडे, सिद्धार्थ भान, अनुराज कोळसे, अनुष्का कोळसे, भक्ती उरे, ज्ञानेश्वरी मुसमाडे, ईश्वरी गागरे आणि अंश ठोंबरे यांची विविध मंत्रीपदांवर निवड करण्यात आली. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, महसूल मंत्री, शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, कृषिमंत्री आदी पदांची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य अरुण पारखे, उपप्राचार्य सागर कडू, समन्वयक औदुंबर कडू, महिला समन्वयक दिपाली कडू, नामूयल रायता, रवींद्र घागरे, शीतल जाधव, जयश्री पागिरे, कांचन साठे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध व परिश्रमपूर्वक काम केले.

या अभिनव उपक्रमाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव शेलार व सचिव मनीषा शेलार यांनी सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदन करत हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये रुजविणारा, नेतृत्वगुण विकसित करणारा आणि प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले. तसेच निवडून आलेल्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना शुभेच्छा देत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणारा आणि मतदान प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करणारा आदर्श उपक्रम ठरल्याची भावना पालक व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

 

पत्रकार राहुल कोळसे गुहा:मो:8484083200

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!